Sunday, March 02, 2008

एका पुलाच्या निमीत्त्याने......

द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय....



THIS BRIDGE
WAS DESIGNED AND CONSTRUCTED BY
SOLDIERS OF THE BRITISH ARMY
FEB - MAY 1943
Lt. COL. L. NICHOLSON D.S.O. COMMANDING

७ ऑस्कर विजेता १९५७ साली प्रदर्शित झालेला हा सत्य घटनेवरचा एक छान चित्रपट. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १९४२-४३ मधली घटना. थोडक्यात कथानक...

जपान्यांना बँकाँक - रंगून रेल रोड (पक्षी: लोहमार्ग) बांधताना एका टप्प्यावर क्वाय नदीवर पूल बांधायचा आहे. पूलाची जबाबदारी ज्या जपानी छावणी कडे आहे तिचा प्रमुख आहे कर्नल सायटो (सेसुई हायाकावा). त्याच्या छावणी मधे जे नविन ब्रिटीश युद्धकैदी आणले जातात त्यांना तो पूल बांधायला सांगतो. या युद्धकैद्यांचा प्रमुख आहे कर्नल निकोलस (एलेक गिनीस). कर्नल सायटो ब्रिटीश युद्धकैद्यांना कामाला जुंपतो. कर्नल सायटो ब्रिटीश अधिकाऱ्यांना सुद्धा कष्टाची कामे करण्याची आज्ञा देतो आणि त्याला कर्नल निकोलस विरोध करतो कारण जिनीव्हा करारानुसार अधिकाऱ्यांना कष्टाची कामे सांगता येत नाहित. चिडलेला सायटो निकोलस आणि त्याच्या अधिकाऱ्यांना इतर युद्धकैदी पासुन वेग्ल्य अश्या छळ कोठडीत डांबतो. निकोलसला तो एका जेमतेम एक माणुस मावेल इतक्या छोट्या टपरी मधे कोंडुन ठेवतो. निकोलस तरीही बधत नाही. एकीकडे निकोलस बधत नाही, ब्रिटिश युद्धकैदी जपानी अधिकाऱ्यांना धूप घालत नाही, दुसरीकडे कामाची डेड्लाईन जवळ आलेली. शेवटी सायटो माघार घेतो आणि निकोलस त्याच्या अधिकाऱ्यांनासह पुलाचे काम ताब्यात घेतो.
या छावणीतून अमेरिकन युद्धकैदी शिअर्स (विल्यम होल्डेन) पळुन जातो आणि ब्रिटिश सैन्य़ाच्या ताब्यात सापडतो. ब्रिटिश शिअर्सच्या मदतीने पूल उडवायची योजना आखतात.
त्यासाठी ब्रिटिश मेजर वार्डनच्या नेत्रुत्वाखाली अमेरिकन खलाशी शिअर्स आणि काही ब्रिटिश छापामार पुल उडवायला निघतात. इकडे पुलाचे काम जोरात सुरु असते. निकोलस आपल्या सैन्यात परत एकदा शिस्त आणतो आणि पुलाचे काम पुर्ण करतो. पुलावरुन जेव्हा पहिली गाडी जाईल तेव्हा पुल उडवायचा वार्डनचा कट असतो. त्यासाठी ते पुलाखाली सुरुंग पेरतात.
गाडी जायच्या थोडा वेळ आधी निकोलसला सुरुंगाची तार दिसते आणि तो तिचा माग घेत सायटोसह जातो. सुरुंग ब्रिटिशांनी पेरला आहे हे कळल्यावर निकोलस गोंधळतो, राष्ट्रनिष्ठा कि आपल्याच सैनिकांनी रात्रीचा दिवस करुन तयार केलेला पुल यातील कशाला महत्व द्यावे हे त्याला कळत नाही, पुलावरुन गाडी जात असते नेमका त्याच क्षणी ब्रिटिश अधिकारी वार्डनने फ़ेकलेल्या बॉंब ने जखमी होवून निकोलस सुरुंगाच्या खटक्यावर पडतो आणि पुल ध्वस्त होतो.
शत्रुच्या हाती सापडतील या भीतीने साथीदारांना मारावे लागले म्हणुन वैतागलेला मेजर वार्डन मॉर्टर लॉंचर फ़ेकुन देतो आणि युद्धाची निरर्थकता दाखवत चित्रपट संपतो.
चित्रपटाची पटकथा बेतली आहे, पीअरे बाउलो लिखीत(Pierre Boulle)द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय नामक फ़्रेंच कादंबरीवर.
१९४२-४३ मध्ये घडलेल्या घटनेचा नायक होता ब्रिटिश लेफ़्टनंट कर्नल फिलीप तुसे (Philip Toosey). प्रत्यक्षात पुल बनवायला ८ महिने लागले होते. पुल सुद्धा २ बनवले होते आणि ते पुल २ वर्ष वापरण्यात आले.

चित्रीकरण श्रीलंकेच्या घनदाट जंगलातले आहे.
संवाद उत्कृष्ट आहेत. उदा. छावणी बद्दल शिअर्स निकोलसला म्हणतो, ’Here is no civilisation.' 'Then we have a chance to introduce it.' निकोलस उत्तरतो.
सिनेमातले दोन हेकेखोर अधिकारी (निकोलस आणि सायटो) दोन वेगवेगळ्या संस्कृती मधला संघर्ष दाखवता्त.पराभूत झाले तर हाराकिरि असे मानणाऱ्या संस्कृतीचा सायटो निकोलसला म्हणतो,’I hate the British. You are defeated, but you have no shame. You are stubborn, but have no pride. You endure, but you have no courage.'
प्रत्यक्षात त्या दोहोत कितीतरी साम्य आहे. तोच अहंकार, कामावरची निष्ठा (छावणीतुन पळुन जाण्याबाबत निकोलस म्हणतो,’वरिष्ठांनी आज्ञा दिल्यामुळे मी शरणागती पत्करली आहे, त्यामुळे पळुन जाणे हा आज्ञाभंग होईल.)
निकोलस पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत जागरुक आहे, त्याबाबतीत तडजोड करायला तो तयार नाही. दुसरा एक युद्धकैदी डॉक्टर क्लिप्टन (जेम्स डोनाल्ड) निकोलस ला जेव्हा विचारतो कि ’शत्रुसाठी इतका दर्जेदार पुल तयार करणे म्हणजे, स्वराष्ट्राशी बेइमानी नव्हे काय?’ निकोलस त्याला सांगतो कि या पुलामुळे त्याची बटालियन परत एकदा सैनिक असल्यागत वागु लागली आहे,ते जे काही करत आहेत त्याचा त्यांना अभिमान वाटतो,’One day the war will be over. And I hope that the people that use this bridge in years to come will remember how it was built and who built it. Not a gang of slaves, but soldiers, British soldiers, Clipton, even in captivity’
युद्ध काळातही त्याचा आशावाद कायम आहे.
चित्रपटाला ८ ऑस्कर नामांकने मिळाली होती. त्यातील फ़क्त सहकलाकाराचे सेसुइ हायाकावा (कर्नल सायटो) सोडुन इतर सर्व ऑस्कर मिळालीत.
१. सर्वोत्कृष्ट चित्रपट
२. सर्वोत्कृष्ट कलाकार - एलेक गिनीस
३.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - डेव्हीड लीन
४. इतर भाषेतील कथानकावर आधारित सर्वोत्कृष्ट पटकथा - (मुळ कथानक फ़्रेंच)पीअरे बाउलो
५. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफ़ि
६. सर्वात हिट सिनेमा
७. सर्वोत्कृष्ट संकलन.


जाता जाता:
द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय मध्ये युद्धाची निरर्थकता दाखवताना हिंसाचार कमीत कमी दाखवला आहे, इथे जे.पी. दत्ताच्या बॉर्डर ची (सनी देओल) आठवण येते, ३ तास आपला मनसोक्त हिंसाचार दाखवुन जे.पी. गाणे ऐकवतात ,’मेरे दुश्मन मेरे भाई....यह जंग ना होने पाए.’ जे.पी. ना काय सांगायचे हे मला आजतागायत कळले नाही. त्यांना तरी कळले असेल?

No comments: