Monday, April 28, 2008

गाण्यातले झाड

...आणि मग कुमार गंधर्व बागेश्री रागात गाउ लागतात ’टेसुल बन फ़ुले’ - हरेकृष्णजी. माझ्या मागच्या लिखाणावर हरेकृष्णजी यांची ही प्रतिक्रिया. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, हरेकृष्णजी.
प्रतिक्रिया वाचुन मी विचार केला कि बघुयात तर पलाश शिवाय इतर कोणते वृक्ष गाण्यामध्ये आले आहेत?
मिळालेली उत्तरे भन्नाट आहेत, पुर्ण नाहीत; पण intersting आहेत. बालपणातले कौतुक सगळ्य़ात जास्त आहे ते निंबोणीला ’निंबोणीच्या झाडामागे...’ हे तर घराघरातल्या मायमाऊलीचं आवडतं अंगाई गीत.
या अंगाईगीताचा वापर करुन बऱ्याचदा बाबा लोक पण आपला गळा साफ़ करुन घेतात;निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला चांदण्याला नीज आली,तरीही नंदलाला झोपत नाही
(बाबांनी गायल्यावर झोप येण्यापेक्षा उडण्याचीच शक्यता अधिक) हे पाहुन रातराणीच्या गंधाचा आसरा घ्यावा लागतो,
सावल्यांची तीट गाली, चांदण्याला नीज आली रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे, नीज माझ्या नंदलाला रे॥
कोणी बच्चे कंपनीला बोलावते, ’या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फ़ुले वेचुया’ आणि कंपनी मोराला आंब्याच्या वनात नाचायला सांगते.
तर कोणी माहेरवाशिण आपले बालपण आठवताना सांगते, बकुळी माझी सखी जिवाची जन्मांतरीचे प्रेम जुने,
मला पाहता फ़ुलते ती अन तिला पाहता मी ही फ़ुलते.
शब्द हे अक्षर असतात. अक्षर म्हणजे कधीही न भंगणारे. इच्छेविरुद्ध निरोप घ्यायचा प्रसंग आला तर कोणितरी आठवण म्हणुन शब्दच जपुन ठेवायला सांगतय,
’शब्द शब्द जपुन ठेव, बकुळीच्या फ़ुलापरी’ एखाद्याला देण्यासाठी यापेक्षा अमिट भेट ती काय असणार?
प्रियकर प्रेयसीला ऐकवतो, ’दुरच्या रानातल्या बकुळीच्या तळी, प्रितीची गीते किती प्रिये रंगली पहा.’
बकुळ जसे सतत आनंदात आहे तसे चाफ़्याचे मात्र नाही, तो खंत करतोय कसली तरी:
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी; काही केल्या फुलेना. लतादिदिंनी गायलेल्या या गीतात कवि ’बी’ चाफ़्याला फ़ुलविण्यासाठी केतकीच्या बनी घेउन गेले, आंब्याच्या वनात नेउन मैनेसवे गाणी म्हटली, तेव्हा कोठे चाफ़ा फ़ुलला.चाफ़्याच्या संदर्भातलं आणखी एक गीत मला मिळाल ते गदिमांच मालती पांडेंच्या आवाजातल,
लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छ्पेल का?
प्रीत लपवुनी लपेल का ?
मोगरा पण दोन गीतांमध्ये दरवळतो. ज्ञानेश्वरांचा ’मोगरा फ़ुलला’ तर गदिमांना पडलेला प्रश्न ’का मोगरा फ़ुलेना?’.
एका नवयौवनेला सावध राहण्याचा सल्ला देत कवी म्हणतो ’केतकीच्या बनात उतरत्या उन्हात सळ्‌सळ्‌ पानात जपून जा जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग’ आणि त्याच वेळेस जगाची रीतभात जाणुन असलेली कोणाला सुनावीत असते ’चिंचा आल्यात पाडाला हात नको लावूस झाडाला माझ्या झाडाला !माझ्या नजरेत गोफणखडा पुढं पुढं येसी मुर्दाडा काय म्हणू तुझ्या येडाला ?’नाहीतर ’मी लवंगी मिरची कोल्हापुरची’ असे ठसक्यात सांगत असते. शहरी भागात दारोदार दिसणारा गुलमोहर वसंतात फ़ुलतो. आणि त्याच्या फ़ुलण्य़ाने कुणी अभिसारीका आपल्या प्रियकराच्या आठवणीने गाउ लागते ’अंगणी गुलमोहर फुलला....वसंत आला, याल तुम्हीही, कोकिळ कुजबुजला’ प्रीतीची किमयाच न्यारी, तेथे ’दगडांच्या देशा’ असलेला महाराष्ट्र, नंदनवन काश्मिर वाटु लागतो आणि चिंचेचे झाड चिनार दिसु लागते. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !
Jealousy thy name is woman सिद्ध करणारी महाभारतातली पारिजात आणि सत्यभामेची कथा तशी सर्वज्ञात तीच कथा गदिमा कवितेत रचतात बहरला पारिजात दारी फुले का, पडती शेजारी कवि अनिल,’किती जरी घातले पाणी, सावली केली केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली’ असे सांगत आपण नेमके कोठे जात आहे यावर भाष्य करतात.

जाता जाता:
माळ्याच्या मळ्यामंदी... अशी सुरुवात असलेले दोन गाणे आहेत
दादा आणि उषा चव्हाण यांचे माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी... आणि साधी माणसं मधील माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पानी जातं.
दादांच्या गाण्याची सुरुवात जरी माळ्य़ाच्या मळ्यामंदी अशी असली तरी नंतर गाण्यात झाडाचा काही उल्लेख नाही.
आणि साधी माणसं मधील माळ्याच्या मळ्यामंदी या गाण्यात माहेरची ओढ फ़ार छान लक्षात येते.
पण अस्सल मळेवाल्याचे वाटावे असे गीत आहे अवधूत गुप्तेचे काळी माती ....हिरवे शिवार. या गाण्यात सगळ्य़ात छान पद्धतीने भाज्यांचा उल्लेख असावा.
मिरचीचा तोरा, काकडीचा बांधा, लिंबावानी कांती, मुळावानी रंग गोरा गोरा, टमाटयावानी गाल, भेंडी वानी बोटं हे ऐकल्यावर मंडईत सुद्धा कसले सुख आहे हे कळतं.