Saturday, October 16, 2010

राष्ट्रकुल

प्रिय गण्या,

दिल्लीला जावुन आलो तेव्हापासुन तब्येत जरा नाजुक झाली आहे. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा पहायला गेलो होतो. १९८२ नंतर प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम भारतात आयोजीत केल्या गेला. म्हटले बघावे कसा होतो ते. पावसाने धिंगाणा घातला होता, ऐन स्पर्धा तोंडावर आली आणि हा पाऊस. निसर्गाचे हे तंत्र तर आपले क्रिडामंत्री गिलसाहेब एकदा जाहिरपणे बोलले कि राष्ट्रकुल साठी खर्च जास्त होतोय. तुला सांगतो गण्या, हे म्हणजे कार्य भरात आले असताना मुलीच्या मामाने रुसुन बसावे तसे झाले. त्यानंतर केंद्रिय दक्षता आयोगाने गिल साहेबांची री ओढत खर्चावर कडक ताशेरे ओढले आणि मग कलमाडी आणि मंडळींच्या नावाने सगळ्यांनी बोंब ठोकली. माध्यम आणि विरोधक कामाला लागली. राष्ट्रकुलच्या भ्रष्टाचाराचे किस्से आम आदमीला कळु लागले.
बालपणी ऐकलेल्या अरेबियन नाईट च्या १००१ सुरस आणि चमत्कारिक कथा म्हणजे यापुढे किस झाड कि पत्ती. अबे, १६०० रुपयचा पेपर ’पुसण्यासाठी’, असे बरेच चमत्कार समोर आलेत. (तो न वापरलेला पेपर एकदा पहावा, असे फ़ार मनी होते, पण तो फ़क्त खेळाडुंसाठीच आहे असे कळले) आजवर झाल्या नसतील अश्या स्पर्धा भरवुन दाखवु हि दर्पोक्ती कलमाडी खरी करणार अशीच परिस्थीती निर्माण झाली होती. स्टेडियम जवळचा पुल कोसळला, कोठे नागराजाने दर्शन दिले, कोण्य़ा खेळाडुचा पलंग तुटला. शेवटी काही पर्याय शिल्लक राहिले नाही हे पाहुन पंतप्रधानांनी परिस्थीती ताब्यात घेतली. आपल्या संयोजन समितीच्या कारनाम्यांमुळे खालच्या मानेने जगापुढे जाण्याची नामुष्की आली. हे सगळे कमी म्हणुन की काय दिल्लीत पर्यटकांवर झालेला गोळीबार.
पण एकदाच्या स्पर्धा सुरु झाल्या आणि भारताचे संयोजन तावुन सुलाखुन निघाले. सगळ्या परिक्षामधे खरे उतरले. आपल्या यजमानपदाची बूज राखल्या गेली.

उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाने पारणे फ़ेडले. यशस्वी संयोजनासाठी भारताच्या वाट्याला कौतुक आले. आपल्या खेळाडुंनी पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळवला म्हणजे सोने पे सुहागा. १०१ पदक. त्यात ३८ सुवर्ण. स्वप्नवत वाटते रे!! अजीबातच अपेक्षा नव्हती. क्रिकेट शिवाय आपण काही खेळतो हे वेळेस पहिल्यांदा कळले. लोक हॉकी आणि बॉक्सिंग चे सामने पहायला गर्दी करत होते. नेमबाज, धनुर्धर, बॉक्सर पदकांची लयलुट करुन आले. त्या सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
गेल्याच आठवड्यात परत आलोय. एकदा तो १६०० रुपड्याचा ’पुसण्य़ाचा’ पेपर पहावा म्हणुन खेळाडुंच्या होस्टेल मध्ये जाण्य़ाचा प्रयत्न केला. पण आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत, मध्येच त्यांच्या तावडीत सापडलो. असो अंग ठणकते आहे.

लेखन सीमा.
-अम्या.

ता.क.- दिल्लीस गेला कधी तर सुरक्षा व्यवस्थे पासुन जपुन.

5 comments:

sharayu said...

माध्यमानी उठविलेला सुनियोजित गदारोळ पाहता कलमाडींवरील आरोप वैयक्तिक आकसापोटी केले आहेत याची खात्री पटते.

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

७०००० करोड खर्च करून साधी डकार सुध्दा दिली नाही कलमाडी आणि कंपनीने, विरोधी पक्षाची तलवार सुध्दा एकदाच बाहेर निघाली होती, काही भोजन त्यांच्या सुध्दा नारडीखाली उतरवले असणार :(

Sunshine said...

Hi Anant, I read a bit of your post...I plan to finish it but you know I read marathi real slow :) Yeah! But awesome post. Great to follow your blog here.

Kalandar said...

@Sharayu: कलमाडींवरचा राग वैयक्तिक असेलही कदाचित. एकदा कोणी कोठे अडकला तर सगळ्यांचेच राग बाहेर पडतात. पण कलमाडी निश्चितच आहेत त्यात.

Kalandar said...

@Prasik: डकार चे जाउच द्या. पण गोंधळ सुरु असताना कलमाडी आधी समोर पण आले नाहित. आणि विरोधी पक्ष पण काय बोलणार, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.