Sunday, December 26, 2010

व्हेज बिर्याणी

मी केलेल्या कोणत्याही पदार्था बद्दल पहिल्यांदाच लिहितोय.
खरेतर भाताच्या या प्रकाराला व्हेज बिर्याणी म्हटले पाहिजे असे काहि नाहि. रेसिपी बिर्याणीची आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्यात थोडे फ़ेरफ़ार केले आहेत.

साहित्य:
भातासाठी:
१. २ वाटी बासमती तांदुळ,
२. १ वाटी फ़ुलकोबी
३. १ किसलेले गाजर,
४. १/२ वाटी मटार,
५. २-३ फ़रसबी तोडुन त्याचे तुकडे करुन घ्या
६. १/२ बटाट्याचे तुकडे

ओला मसाला:
१. ३-४ हिरव्या मिरच्या
२. ३ पाकळ्या लसुण
३. थोडेसे आले (आले म्हणजे अद्रक)
४. १/२ लहान कांदा

कोरडा मसाला
१. २-३ लवंग
२. दालचिनी पावडर
३. जीरा पावडर
४. धणे पावडर
५. हळद
६. तिखट
७. गरम मसाला

इतर साहित्य
१. मीठ
२. दीड वाटी दही
३. १ कॅरमलाईज़्ड कांदा. (कॅरमलाईज़्ड याला मराठी प्रतिशब्द काय आहे?)

कृती:
१. फ़ुलकोबी, गाजर, वाटाणा,फ़रसबीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे अर्धकच्चे शिजवुन घ्यावे.
२. तांदुळाच्या अडिचपट पाणी घेउन त्यात तांदुळ घालावे. वरुन झाकण ठेवुन तांदुळ शिजवावा. उरलेले पाणी काढुन टाकावे. तयार भात परातीत मोकळा करुन ठेवावा.
३. ओला मसाला :
   मिरच्या, लसुण, कांदा, अद्रक एकत्र करा. त्यात २ चमचे दही घालावे आणि हे मिश्रणा वाटुन एकजीव करावे.
४. एका भांड्यात थोडे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात ओल्या मसाल्य़ाची पेस्ट टाकुन परतावे.
५. पेस्ट गुलाबी रंगावर परतुन त्यामध्ये लवंग, १/२ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून जीरा पावडर,
 १ टीस्पून धणे पावडर, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला घालावा.
 १ मिनीट परतुन घ्यावे.
६. दीड वाटी दही आणि अर्धकच्च्या भाज्या घालुन २ मिनीट शिजवावे.
७. भात आणि कॅरमलाईज़्ड कांदा त्यात घालावा. सगळे पदार्थ व्यवस्थीत एकत्र करावेत.
८. २ मिनीट वाफ़वुन घ्यावे.
  बिर्याणी तयार.

कांदा कॅरमलाईज़्ड कसा करावा?
१. कांद्याचे उभे बारीक काप करावे. 
२. तव्यावर थोडे (२-३ चमचे) तेल घालावे. तेल तव्यावर सगळीकडे पसरेल याची काळजी घ्या.
   तेल गरम झाले कि त्यावर कांदा परतवावा.
३. कांदा थोडा परतल्यावर २ चिमटी मीठ आणि १/२ टीस्पून साखर घालावी.
४. कांदा चांगला लालसर रंगावर परतुन घ्यावा.

Sunday, December 19, 2010

विलासरावांचा हस्तक्षेप

प्रिय गण्या,
बरेच दिवस झालेत तुझे पत्र नाही. राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यात. काही काम न करता अधिवेशन पण संपले.  निराबाई, २ जी, राष्ट्रकुल या सगळ्या चौकश्या सुरु राहतील.
सध्या दिवस एकदम ’निरामय’ आहेत. निरा राडिया, निरा यादव. कोणत्याही बातम्या लावा यातले एक तरी नाव कानावर येतेच.
तिकडे हिवाळी अधिवेशनात काम झालेच नाही. इकडे नागपुरला मात्र सध्या दिल्लीकर असलेले अवघड, चुकले अवजड उद्योग मंत्री, चर्चेत होते. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च न्य़ायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड केला. विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या आमदाराच्या वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवुन घेतली जाऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता.विदर्भातल्या खामगावचे आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे वडील गोकुळचंद सानंदा हे व्यवसायाने सावकार आहेत. ज्या काळात देशमुखांचे सहकारी गृहमंत्री आर.आर. पाटील सावकारांना कोपरापासुन ढोपरापर्यंत सोलुन काढायची भाषा करत होते, त्याच काळात हे सावकार सामान्य शेतकऱ्यांना महिना दहा टक्के दराच्या व्याजाच्या बोलीवर कर्जवाटप करत होते.  त्या शेतकऱ्याला मासिक १० टक्के या दराने व्याज लावण्यात आले; म्हणजे वार्षिक १२० टक्के व्याज. हा व्याजाचा दर कोणाचेही कंबरडे मोडेल असाच आहे.
विदर्भात त्यावेळी ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यातल्या बहुतेक शेतकऱ्यांच्या मृत्युला हे असलेच लोभी, धनदांडगे सावकार कारणीभुत आहेत.

आता शासन करदात्यांनी दिलेले १० लाख रुपये दंड भरणार. 
मला सांग गण्या, ही दंडाची रक्कम आपण का भरायची, मर मर करुन पैसा कमवा, सरकारला प्रामाणिकपणे कर द्या. आणि तोच पैसा हे आपल्या कर्मदारिद्र्याने घालवणार. खरे तर देशमुख, सानंदा या जोडगोळी कडुन हा दंड वसुल करायला हवा. संपत्ती जप्त करुन तिचा लिलाव करा आणि ते पैसे शेतकऱ्यांना द्या.  एक शेतकरी हिम्मत करुन न्यायालयात गेला, तेथवर न गेलेले किती असतील कुणास ठावुक.  ह्या राजकारण्य़ांनी महाराष्ट्राचे नामकरण महाभ्रष्ट करण्याची सुपारी घेतली आहे. 
विलासरावांवर तर वेगळा खटला भरावा इतके हे वाईट आहे. 
१. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना ’निष्पक्षपणे काम करीन’ अशी शपथ घेतात, त्या शपथेचा त्यांनी भंग केला.
२. आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला आहे, हे स्पष्ट झाले 
३. त्यांचे सहकारी ज्या वेळेस सावकरांना फ़ोडुन काढायची भाषा बोलत होते तेव्हा हे मात्र सावकारांना संरक्षण देत होते. आपल्याकडे असलेल्या कायद्यानुसार खासगी सावकारी हा शिक्षापात्र गुन्हा  आहे. म्हणजे तसेही पाहिले तरी गुन्हेगाराला पाठीशी घालायचेच काम देशमुखांनी केले आहे
४. इतकेच नव्हे तर ते राज्यघटनेत असणाऱ्या ‘समानतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वाविरुद्ध वागले’’, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी आणि ए.के. गांगुली यांच्या पीठाने म्हटले आहे.

 सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण भरपुर चिखल अंगावर उडवुन घ्यायचा असे ठरवले आहे हे दिसते. ते १०५ हुतात्मे, प्रबोधनकार, अत्रे, डांगे, एस.एम वगैरेंना हे पाहताना काय वेदना होत असतील हे त्यांनाच माहित.
 असो, तू आहेस तिथेच सुखी रहा, महाराष्ट्रात परतण्याची घाई करु नकोस.  परत ये म्हणत नाही याची कारणे वर दिली आहेतच.
सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रातला,
अम्या.

Wednesday, December 01, 2010

नवस

"काय तर ही बया, कानामागुन आली आणि तिखट झाली. जॊ येतो तो हिचीच चौकशी करतो." लाल हिरवीला म्हणाली.
"असेच असते इथे, नवी कोणी आली कि तिचाच गाजावाजा असतो, सगळे तिलाच विचारतात. जुनी झाली कि येइल आपल्यात." हिरवीने समजुतदारपणा दाखवला. "पण ती एकटीच थोडी ना आली असेल. कोणी असेल ना सोबत." उजवीने मधेच नाक खुपसले. "कोणी तरी येणार होती कोकणातुन पण येथवर पोहचली नाही वाटते अजुन. त्यामुळे हिच सगळ्य़ात नवी. शिवाय ’आदर्श’ घरातली, म्हणुन मागणी जास्त. पार दिल्ली पासुन लोक आलेत येथवर हिच्यामुळे." हिरवीने माहिती पुरवली.
"मी तर काल ऐकले कि, ज्यांचे नाव हिच्यासोबत आले ते तर घरी गेलेच, पण ज्यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही अश्या लोकांना पण ही भोवली." उजवी सांगु लागली; तिला तोडुन हिरवी परत मधेच म्हणाली,"तु तरी कोठे कमी होती, तुझ्यामुळे पण १-२ जण घरी गेले होते. इथे येताना सगळे असेच असतात. मी पण येथे येताना फ़ार गोंधळ घातला होता; मोठी उलथापालथ केली होती पण शेवटी नशिबात तुमचीच सोबत होती." लाल परत म्हणाली,"एवढी डिमांड असताना ही का नाराज?"

त्या तिघी जणी बोलत असताना, ती मात्र आपल्याच विचारात होती,"काय चुकले माझे? भल्या भल्या धेंडांना धक्का दिला, हे? का म्हणुन माझ्यासोबत त्याने इतक्या निष्ठुरपणे वागावे? का माझे असे तुकडे करावे त्याने? मी त्याचे काहिहि नुकसान केले नव्हते. माझे लचके तोडताना त्याला काहिच कसे वाटले नाही? छे! आता तर माझी किंमत पण कमी झाली, ती लाल तर आधीच जळते माझ्यावर, हे सगळे जर तिला कळले तर हसेल ना ती फ़िदिफ़िदि. असे नाही जमणार काहिहि करुन ती चार पानं मिळवावे लागतील."

इतक्यात कोणाची तरी चाहुल लागली म्हणुन सगळ्या सावरुन बसल्या. पाहिले तर पाटिल साहेब आणि महादु आले होते.
"महाद्या, अरे आदर्श चे ४ पानं गहाळ झालेत. क्राईम ब्रँच वाले येणार आहेत, एन्क्वायरी करायला. चल आटप लवकर. सगळे जरा आवरुन घे. ह्या एन्रॉन, अण्णा आणि दादा च्या फ़ाईली समोर कशाला, जरा कोपऱ्यात सरकव त्या. ती आदर्श ची फ़ाईल समोर काढुन ठेव. त्यांना द्यायची आहे."

पानं गहाळ झाल्याचे ऐकुन त्या तिघींनी निश्वास सोडला, हिरवी म्हणाली,"एक आणखी सोबत, चला तिला लाल च्या बाजुला जागा देऊ."

क्राईम ब्रँच एन्क्वायरी करणार हे ऐकुन तिची कळी पटकन खुलली, "चला, म्हणजे पानं मिळु शकतात तर. म्हसोबा, माझे पानं मला मिळवुन दे रे बाबा. असे झाले तर २ कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा वाहिन तुला."