Sunday, November 28, 2021

इराणी पुलाव

 #इराणी_पुलाव  #भात #तांदुळ #झटपट #पाककृती 

#भात #तांदुळ #झटपट #पाककृती 

मिसळपाव.कॉमच्या लेखात रेसिपी मिळाली.

ती पाककृती करून पाहिली. छान, सोपा, सुटसुटीत, आणि लज्जतदार पदार्थ.

जिन्नसः ४ जणांसाठी

१. २ कप चिरलेली फरसबी.

२. दिड कप तांदुळ

३. पाचकप टोमॅटो प्युरी. (मी ४ टोमॅटो मिक्सर मधुन काढले, प्युरी घट्ट वाटली म्हणून दिडकप पाणी घातले)

४. चार चमचे तेल

५. चवीला मीठ 


कृती:

१. तांदुळ भिजत घाला. ( किमान ३०-४० मिनीटे)

२. जरा जाड बुडाच्या पातेल्यात ४ चमचे गरम करायला टाका.

३. तेल तापले कि त्यात फरसबी घाला.

४. फरसबी हलवत रहा, फरसबी खमंग झाली (परतलेल्या फरसबीचा मस्त वास पसरतो) कि त्यात टोमॅटो प्युरी घाला.

५. मीठ टाका.

६. उकळी येउ द्या 

७. तांदुळ टाका.

८. तांदळाला उकळी आली की एक नॅपकीन ताटाला गुंडाळून झाकण म्हणून भांड्यावर ठेवा.

९. गॅस मंद करा.

१०. ३० मिनीटांनंतर झाकण सरकवून पहा.

११. भात झाला असेल तर गॅस बंद करा वा अजुन थोडवेळ होउ द्यात.

१२. भात तय्यार असेल तर गॅस बंद करा.

१३. गरम भात, लोणचे, पापड, कांदा टोमॅटो कोशिंबीर, रायता अशा योग्य त्या तोंडी लावण्याबरोबर वाढा.

(टीपः बुडाशी लागलेला, सोनेरी खरपुस भात कोणाला देऊ नका, स्वतः खा. अप्रतिम लागतो.) 





Monday, February 26, 2018

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जैसी दीपांमाझि दिवटी। कां तिथींमाझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मर्हाटी । सर्वोत्तम।।१।।

जैसी सरितांमध्ये गोदावरी। कां पर्वतांमधे रत्नगिरी।
तैसी भाषांमध्ये साजरी। मर्हाटी पै।।२।।

हरळांमध्ये रत्नकिळा। कां पुष्पांमध्ये कमळ।
तैसी भाषांमध्ये सोज्वळ। शोभिवंत दिसे।।३।।

दुर्गावरि शोभे चरी। कां मुक्ताफळे शोभती हारी।
तैसी शोभे भाषांमाझारी मर्हाटी पैं।।४।।

तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी।
भाषांमध्ये तैशी। मर्हाटी शोभिवंत।।५।।

परिमळांमध्ये कस्तुरी। कां अंबरामध्ये शंबरारी।
तैसी मर्हाटी सुंदरी। भाषांमध्ये।।६।।

- संत ज्ञानेश्वर


Tuesday, September 05, 2017

Friday, December 28, 2012

अब्राहम लिंकनचे पत्र


प्रिय  गुरुजी,
                   
         सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
         नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
         हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
         मात्र त्याला हे देखील शिकवा,
         जगात प्रत्येक बदमाशागणिक    
         असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही
         स्वार्थी राजकारणी असतात जगात,
         तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे  नेतेही.
         असतात टपलेले वैरी, तसे जपणारे  मित्रही,
         मला माहित आहे !
         सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
         तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
         घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
         आयत्या  मिळालेल्या  घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
         हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
         आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
         तुमच्यात शक्ती असती तर .........
         त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
         आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
         गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
         त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
         जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
         ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
         मात्र त्याबरोबरच ,
         मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
         सृष्टीचं शाश्वत सौंदर्य  अनुभवायला ,
         पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............
         सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
         आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
         शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
         फसवून  मिळालेल्या यशापेक्षा ,
         सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
         आपल्या कल्पना, आपले विचार ,
         यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
         बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
         त्याला सांगा ................
         भल्याशी भलायीन वागावं,
         आणि टग्यांना अद्दल घडवावी .
         माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
         जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
         सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
         पुढे हेही सांगा त्याला ,
         ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
         पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
         आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
         जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
         हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
         आणि म्हणावं त्याला
         आसवांची   लाज वाटू देऊ नको.          
         त्याला शिकवा .........
         तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला ,
         अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
         त्याला हे पुरेपूर समजवा की ,
         करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
         पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
         धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
         कानाडोळा करायला शिकवा त्याला.
         आणि ठसवा त्याच्या मनावर,
         जे सत्य आणि न्याय वाटते,
         त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
         त्याला ममतेन वागवा,
         पण, लाडावून ठेवू नका.
         आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
         लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
         त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
         अन धरला पाहिजे धीर त्याने,
         जर गाजवायच असेल शौर्य .
         आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
         आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
         तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
         माफ करा गुरुजी,
         मी फार बोललो आहे  _
         खूप काही मागतो आहे.........
         पण पहा........
         जमेल तेवढ अवश्य कराच,
         माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.
                                                   
                                                                      अब्राहम लिंकन

Sunday, November 18, 2012

बाळासाहेब

कार्यकर्त्याच्या जातीपेक्षा कर्तुत्व पाहणारे साहेब, तुम्ही वेगळे नेते होतात.
शत्रूसुद्धा ज्याचा शब्दावर विश्वास ठेवत असे साहेब, तुम्ही वेगळे राजकारणी होतात.
एकदा निर्णय घेतला कि तो न बदलणारे साहेब, तुम्ही वेगळे होतात.
ब्रशच्या एका फटक्याने संपादकापेक्षा अधिक सांगणारे साहेब, तुम्ही वेगळे चित्रकार होतात
महाराष्ट्राची वेस न ओलांडता देशाचे राजकारण करणारे साहेब, तुम्ही वेगळे होतात
गेली ४० वर्ष दसऱ्याला विचाराचे सोने वाटणारे साहेब, तुम्ही वेगळे होतात
लाखालाखाच्या सभेत चैतन्य ओतणारे साहेब, तुम्ही वेगळे वक्ते होतात
ईतिहासाचा अभ्यास करणारे खूप असतात पण ईतिहास घडवणारे साहेब, तुम्ही वेगळे पत्रकार होतात
साहेब, तुम्ही वेगळेच होतात.
एकच साहेब बाळासाहेब!! ढाण्या वाघाला मानाचा मुजरा !!!

Sunday, December 26, 2010

व्हेज बिर्याणी

मी केलेल्या कोणत्याही पदार्था बद्दल पहिल्यांदाच लिहितोय.
खरेतर भाताच्या या प्रकाराला व्हेज बिर्याणी म्हटले पाहिजे असे काहि नाहि. रेसिपी बिर्याणीची आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्यात थोडे फ़ेरफ़ार केले आहेत.

साहित्य:
भातासाठी:
१. २ वाटी बासमती तांदुळ,
२. १ वाटी फ़ुलकोबी
३. १ किसलेले गाजर,
४. १/२ वाटी मटार,
५. २-३ फ़रसबी तोडुन त्याचे तुकडे करुन घ्या
६. १/२ बटाट्याचे तुकडे

ओला मसाला:
१. ३-४ हिरव्या मिरच्या
२. ३ पाकळ्या लसुण
३. थोडेसे आले (आले म्हणजे अद्रक)
४. १/२ लहान कांदा

कोरडा मसाला
१. २-३ लवंग
२. दालचिनी पावडर
३. जीरा पावडर
४. धणे पावडर
५. हळद
६. तिखट
७. गरम मसाला

इतर साहित्य
१. मीठ
२. दीड वाटी दही
३. १ कॅरमलाईज़्ड कांदा. (कॅरमलाईज़्ड याला मराठी प्रतिशब्द काय आहे?)

कृती:
१. फ़ुलकोबी, गाजर, वाटाणा,फ़रसबीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे अर्धकच्चे शिजवुन घ्यावे.
२. तांदुळाच्या अडिचपट पाणी घेउन त्यात तांदुळ घालावे. वरुन झाकण ठेवुन तांदुळ शिजवावा. उरलेले पाणी काढुन टाकावे. तयार भात परातीत मोकळा करुन ठेवावा.
३. ओला मसाला :
   मिरच्या, लसुण, कांदा, अद्रक एकत्र करा. त्यात २ चमचे दही घालावे आणि हे मिश्रणा वाटुन एकजीव करावे.
४. एका भांड्यात थोडे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात ओल्या मसाल्य़ाची पेस्ट टाकुन परतावे.
५. पेस्ट गुलाबी रंगावर परतुन त्यामध्ये लवंग, १/२ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून जीरा पावडर,
 १ टीस्पून धणे पावडर, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला घालावा.
 १ मिनीट परतुन घ्यावे.
६. दीड वाटी दही आणि अर्धकच्च्या भाज्या घालुन २ मिनीट शिजवावे.
७. भात आणि कॅरमलाईज़्ड कांदा त्यात घालावा. सगळे पदार्थ व्यवस्थीत एकत्र करावेत.
८. २ मिनीट वाफ़वुन घ्यावे.
  बिर्याणी तयार.

कांदा कॅरमलाईज़्ड कसा करावा?
१. कांद्याचे उभे बारीक काप करावे. 
२. तव्यावर थोडे (२-३ चमचे) तेल घालावे. तेल तव्यावर सगळीकडे पसरेल याची काळजी घ्या.
   तेल गरम झाले कि त्यावर कांदा परतवावा.
३. कांदा थोडा परतल्यावर २ चिमटी मीठ आणि १/२ टीस्पून साखर घालावी.
४. कांदा चांगला लालसर रंगावर परतुन घ्यावा.