Friday, December 28, 2012

अब्राहम लिंकनचे पत्र


प्रिय  गुरुजी,
                   
         सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
         नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
         हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
         मात्र त्याला हे देखील शिकवा,
         जगात प्रत्येक बदमाशागणिक    
         असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही
         स्वार्थी राजकारणी असतात जगात,
         तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे  नेतेही.
         असतात टपलेले वैरी, तसे जपणारे  मित्रही,
         मला माहित आहे !
         सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
         तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
         घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
         आयत्या  मिळालेल्या  घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
         हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
         आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
         तुमच्यात शक्ती असती तर .........
         त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
         आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
         गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
         त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
         जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
         ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
         मात्र त्याबरोबरच ,
         मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
         सृष्टीचं शाश्वत सौंदर्य  अनुभवायला ,
         पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............
         सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
         आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
         शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
         फसवून  मिळालेल्या यशापेक्षा ,
         सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
         आपल्या कल्पना, आपले विचार ,
         यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
         बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
         त्याला सांगा ................
         भल्याशी भलायीन वागावं,
         आणि टग्यांना अद्दल घडवावी .
         माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
         जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
         सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
         पुढे हेही सांगा त्याला ,
         ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
         पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
         आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
         जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
         हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
         आणि म्हणावं त्याला
         आसवांची   लाज वाटू देऊ नको.          
         त्याला शिकवा .........
         तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला ,
         अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
         त्याला हे पुरेपूर समजवा की ,
         करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
         पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
         धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
         कानाडोळा करायला शिकवा त्याला.
         आणि ठसवा त्याच्या मनावर,
         जे सत्य आणि न्याय वाटते,
         त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
         त्याला ममतेन वागवा,
         पण, लाडावून ठेवू नका.
         आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
         लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
         त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
         अन धरला पाहिजे धीर त्याने,
         जर गाजवायच असेल शौर्य .
         आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
         आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
         तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
         माफ करा गुरुजी,
         मी फार बोललो आहे  _
         खूप काही मागतो आहे.........
         पण पहा........
         जमेल तेवढ अवश्य कराच,
         माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.
                                                   
                                                                      अब्राहम लिंकन

Sunday, November 18, 2012

बाळासाहेब

कार्यकर्त्याच्या जातीपेक्षा कर्तुत्व पाहणारे साहेब, तुम्ही वेगळे नेते होतात.
शत्रूसुद्धा ज्याचा शब्दावर विश्वास ठेवत असे साहेब, तुम्ही वेगळे राजकारणी होतात.
एकदा निर्णय घेतला कि तो न बदलणारे साहेब, तुम्ही वेगळे होतात.
ब्रशच्या एका फटक्याने संपादकापेक्षा अधिक सांगणारे साहेब, तुम्ही वेगळे चित्रकार होतात
महाराष्ट्राची वेस न ओलांडता देशाचे राजकारण करणारे साहेब, तुम्ही वेगळे होतात
गेली ४० वर्ष दसऱ्याला विचाराचे सोने वाटणारे साहेब, तुम्ही वेगळे होतात
लाखालाखाच्या सभेत चैतन्य ओतणारे साहेब, तुम्ही वेगळे वक्ते होतात
ईतिहासाचा अभ्यास करणारे खूप असतात पण ईतिहास घडवणारे साहेब, तुम्ही वेगळे पत्रकार होतात
साहेब, तुम्ही वेगळेच होतात.
एकच साहेब बाळासाहेब!! ढाण्या वाघाला मानाचा मुजरा !!!

Sunday, December 26, 2010

व्हेज बिर्याणी

मी केलेल्या कोणत्याही पदार्था बद्दल पहिल्यांदाच लिहितोय.
खरेतर भाताच्या या प्रकाराला व्हेज बिर्याणी म्हटले पाहिजे असे काहि नाहि. रेसिपी बिर्याणीची आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्यात थोडे फ़ेरफ़ार केले आहेत.

साहित्य:
भातासाठी:
१. २ वाटी बासमती तांदुळ,
२. १ वाटी फ़ुलकोबी
३. १ किसलेले गाजर,
४. १/२ वाटी मटार,
५. २-३ फ़रसबी तोडुन त्याचे तुकडे करुन घ्या
६. १/२ बटाट्याचे तुकडे

ओला मसाला:
१. ३-४ हिरव्या मिरच्या
२. ३ पाकळ्या लसुण
३. थोडेसे आले (आले म्हणजे अद्रक)
४. १/२ लहान कांदा

कोरडा मसाला
१. २-३ लवंग
२. दालचिनी पावडर
३. जीरा पावडर
४. धणे पावडर
५. हळद
६. तिखट
७. गरम मसाला

इतर साहित्य
१. मीठ
२. दीड वाटी दही
३. १ कॅरमलाईज़्ड कांदा. (कॅरमलाईज़्ड याला मराठी प्रतिशब्द काय आहे?)

कृती:
१. फ़ुलकोबी, गाजर, वाटाणा,फ़रसबीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे अर्धकच्चे शिजवुन घ्यावे.
२. तांदुळाच्या अडिचपट पाणी घेउन त्यात तांदुळ घालावे. वरुन झाकण ठेवुन तांदुळ शिजवावा. उरलेले पाणी काढुन टाकावे. तयार भात परातीत मोकळा करुन ठेवावा.
३. ओला मसाला :
   मिरच्या, लसुण, कांदा, अद्रक एकत्र करा. त्यात २ चमचे दही घालावे आणि हे मिश्रणा वाटुन एकजीव करावे.
४. एका भांड्यात थोडे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात ओल्या मसाल्य़ाची पेस्ट टाकुन परतावे.
५. पेस्ट गुलाबी रंगावर परतुन त्यामध्ये लवंग, १/२ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून जीरा पावडर,
 १ टीस्पून धणे पावडर, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला घालावा.
 १ मिनीट परतुन घ्यावे.
६. दीड वाटी दही आणि अर्धकच्च्या भाज्या घालुन २ मिनीट शिजवावे.
७. भात आणि कॅरमलाईज़्ड कांदा त्यात घालावा. सगळे पदार्थ व्यवस्थीत एकत्र करावेत.
८. २ मिनीट वाफ़वुन घ्यावे.
  बिर्याणी तयार.

कांदा कॅरमलाईज़्ड कसा करावा?
१. कांद्याचे उभे बारीक काप करावे. 
२. तव्यावर थोडे (२-३ चमचे) तेल घालावे. तेल तव्यावर सगळीकडे पसरेल याची काळजी घ्या.
   तेल गरम झाले कि त्यावर कांदा परतवावा.
३. कांदा थोडा परतल्यावर २ चिमटी मीठ आणि १/२ टीस्पून साखर घालावी.
४. कांदा चांगला लालसर रंगावर परतुन घ्यावा.

Sunday, December 19, 2010

विलासरावांचा हस्तक्षेप

प्रिय गण्या,
बरेच दिवस झालेत तुझे पत्र नाही. राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यात. काही काम न करता अधिवेशन पण संपले.  निराबाई, २ जी, राष्ट्रकुल या सगळ्या चौकश्या सुरु राहतील.
सध्या दिवस एकदम ’निरामय’ आहेत. निरा राडिया, निरा यादव. कोणत्याही बातम्या लावा यातले एक तरी नाव कानावर येतेच.
तिकडे हिवाळी अधिवेशनात काम झालेच नाही. इकडे नागपुरला मात्र सध्या दिल्लीकर असलेले अवघड, चुकले अवजड उद्योग मंत्री, चर्चेत होते. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च न्य़ायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड केला. विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या आमदाराच्या वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवुन घेतली जाऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता.विदर्भातल्या खामगावचे आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे वडील गोकुळचंद सानंदा हे व्यवसायाने सावकार आहेत. ज्या काळात देशमुखांचे सहकारी गृहमंत्री आर.आर. पाटील सावकारांना कोपरापासुन ढोपरापर्यंत सोलुन काढायची भाषा करत होते, त्याच काळात हे सावकार सामान्य शेतकऱ्यांना महिना दहा टक्के दराच्या व्याजाच्या बोलीवर कर्जवाटप करत होते.  त्या शेतकऱ्याला मासिक १० टक्के या दराने व्याज लावण्यात आले; म्हणजे वार्षिक १२० टक्के व्याज. हा व्याजाचा दर कोणाचेही कंबरडे मोडेल असाच आहे.
विदर्भात त्यावेळी ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यातल्या बहुतेक शेतकऱ्यांच्या मृत्युला हे असलेच लोभी, धनदांडगे सावकार कारणीभुत आहेत.

आता शासन करदात्यांनी दिलेले १० लाख रुपये दंड भरणार. 
मला सांग गण्या, ही दंडाची रक्कम आपण का भरायची, मर मर करुन पैसा कमवा, सरकारला प्रामाणिकपणे कर द्या. आणि तोच पैसा हे आपल्या कर्मदारिद्र्याने घालवणार. खरे तर देशमुख, सानंदा या जोडगोळी कडुन हा दंड वसुल करायला हवा. संपत्ती जप्त करुन तिचा लिलाव करा आणि ते पैसे शेतकऱ्यांना द्या.  एक शेतकरी हिम्मत करुन न्यायालयात गेला, तेथवर न गेलेले किती असतील कुणास ठावुक.  ह्या राजकारण्य़ांनी महाराष्ट्राचे नामकरण महाभ्रष्ट करण्याची सुपारी घेतली आहे. 
विलासरावांवर तर वेगळा खटला भरावा इतके हे वाईट आहे. 
१. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना ’निष्पक्षपणे काम करीन’ अशी शपथ घेतात, त्या शपथेचा त्यांनी भंग केला.
२. आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला आहे, हे स्पष्ट झाले 
३. त्यांचे सहकारी ज्या वेळेस सावकरांना फ़ोडुन काढायची भाषा बोलत होते तेव्हा हे मात्र सावकारांना संरक्षण देत होते. आपल्याकडे असलेल्या कायद्यानुसार खासगी सावकारी हा शिक्षापात्र गुन्हा  आहे. म्हणजे तसेही पाहिले तरी गुन्हेगाराला पाठीशी घालायचेच काम देशमुखांनी केले आहे
४. इतकेच नव्हे तर ते राज्यघटनेत असणाऱ्या ‘समानतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वाविरुद्ध वागले’’, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी आणि ए.के. गांगुली यांच्या पीठाने म्हटले आहे.

 सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण भरपुर चिखल अंगावर उडवुन घ्यायचा असे ठरवले आहे हे दिसते. ते १०५ हुतात्मे, प्रबोधनकार, अत्रे, डांगे, एस.एम वगैरेंना हे पाहताना काय वेदना होत असतील हे त्यांनाच माहित.
 असो, तू आहेस तिथेच सुखी रहा, महाराष्ट्रात परतण्याची घाई करु नकोस.  परत ये म्हणत नाही याची कारणे वर दिली आहेतच.
सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रातला,
अम्या.

Wednesday, December 01, 2010

नवस

"काय तर ही बया, कानामागुन आली आणि तिखट झाली. जॊ येतो तो हिचीच चौकशी करतो." लाल हिरवीला म्हणाली.
"असेच असते इथे, नवी कोणी आली कि तिचाच गाजावाजा असतो, सगळे तिलाच विचारतात. जुनी झाली कि येइल आपल्यात." हिरवीने समजुतदारपणा दाखवला. "पण ती एकटीच थोडी ना आली असेल. कोणी असेल ना सोबत." उजवीने मधेच नाक खुपसले. "कोणी तरी येणार होती कोकणातुन पण येथवर पोहचली नाही वाटते अजुन. त्यामुळे हिच सगळ्य़ात नवी. शिवाय ’आदर्श’ घरातली, म्हणुन मागणी जास्त. पार दिल्ली पासुन लोक आलेत येथवर हिच्यामुळे." हिरवीने माहिती पुरवली.
"मी तर काल ऐकले कि, ज्यांचे नाव हिच्यासोबत आले ते तर घरी गेलेच, पण ज्यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही अश्या लोकांना पण ही भोवली." उजवी सांगु लागली; तिला तोडुन हिरवी परत मधेच म्हणाली,"तु तरी कोठे कमी होती, तुझ्यामुळे पण १-२ जण घरी गेले होते. इथे येताना सगळे असेच असतात. मी पण येथे येताना फ़ार गोंधळ घातला होता; मोठी उलथापालथ केली होती पण शेवटी नशिबात तुमचीच सोबत होती." लाल परत म्हणाली,"एवढी डिमांड असताना ही का नाराज?"

त्या तिघी जणी बोलत असताना, ती मात्र आपल्याच विचारात होती,"काय चुकले माझे? भल्या भल्या धेंडांना धक्का दिला, हे? का म्हणुन माझ्यासोबत त्याने इतक्या निष्ठुरपणे वागावे? का माझे असे तुकडे करावे त्याने? मी त्याचे काहिहि नुकसान केले नव्हते. माझे लचके तोडताना त्याला काहिच कसे वाटले नाही? छे! आता तर माझी किंमत पण कमी झाली, ती लाल तर आधीच जळते माझ्यावर, हे सगळे जर तिला कळले तर हसेल ना ती फ़िदिफ़िदि. असे नाही जमणार काहिहि करुन ती चार पानं मिळवावे लागतील."

इतक्यात कोणाची तरी चाहुल लागली म्हणुन सगळ्या सावरुन बसल्या. पाहिले तर पाटिल साहेब आणि महादु आले होते.
"महाद्या, अरे आदर्श चे ४ पानं गहाळ झालेत. क्राईम ब्रँच वाले येणार आहेत, एन्क्वायरी करायला. चल आटप लवकर. सगळे जरा आवरुन घे. ह्या एन्रॉन, अण्णा आणि दादा च्या फ़ाईली समोर कशाला, जरा कोपऱ्यात सरकव त्या. ती आदर्श ची फ़ाईल समोर काढुन ठेव. त्यांना द्यायची आहे."

पानं गहाळ झाल्याचे ऐकुन त्या तिघींनी निश्वास सोडला, हिरवी म्हणाली,"एक आणखी सोबत, चला तिला लाल च्या बाजुला जागा देऊ."

क्राईम ब्रँच एन्क्वायरी करणार हे ऐकुन तिची कळी पटकन खुलली, "चला, म्हणजे पानं मिळु शकतात तर. म्हसोबा, माझे पानं मला मिळवुन दे रे बाबा. असे झाले तर २ कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा वाहिन तुला."

Wednesday, November 24, 2010

मुख्यमंत्र्यांचा दिवस

भारताच्या राजकारणात कालचा दिवस मुख्यमंत्र्यांचा ठरला. बिहारातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने विक्रमी बहुमत मिळवत एकछत्री अंमल प्रस्थापित केला.
कॉंग्रेस, राजद-लोजपा यांचा धुव्वा उडवत परत एकदा नितीशकुमारांनी सत्ता मिळवली आहे. भाजप हा नितीशकुमारांचा (जद(सं)) सत्तेतील भागीदार. कॉंग्रेस ची संख्या ९ वरुन ४ झाली. लालुप्रसादांच्या कंदिलाचा प्रकाश मंदावला आहे. त्यांचे संख्याबळ ४३ चे २२ झाले. रामविलास पासवानांचे तर फ़क्त ३ उमेदवार निवडुन आलेत. कॉंग्रेस, राजद-लोजपा यांना अस्मान दाखवुन सत्ताकारणात ’विकास’ हा महत्वाचा मुद्दा आहे हे बिहारी जनतेने जाणवुन दिले आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी यातुन काय तो बोध घ्यावा.

आंध्रात रोसय्या गेले; किरण रेड्डी आले
प्रकृतीचे कारण देत आंध्र प्रदेशात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री रोसय्या यांनी राजीनामा दिला. जगनमोहन यांना मुख्यमंत्री पदाची असलेली घाई, आधी अम्मा असा ज्यांचा उल्लेख केला त्या सोनिया गांधींवर जगनमोहन यांच्या साक्षी वाहिनीने टिका केली. आधीच जगनमोहन यांना फ़ारसे अनुकुल नसलेले मत त्यांच्या विरोधात गेले. रोसय्यांची गच्छंती त्यांच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे झाली. रोसय्याचे उत्तराधिकारी म्हणून विधानसभा अध्यक्ष किरणकुमार रेड्डी यांचे नाव निश्‍चित झाले.

कर्नाटकात येदियुरप्पा राहिले
कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्यापुढे नमायला लावून मुख्यमंत्रीपद शाबूत राखले आहे. येदियुरप्पा हे सरकारी भूखंडाचे नातेवाईकांना केलेल्या वाटपावरून अडचणीत आले होते. त्यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्याचे संकेत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पण येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपद टिकवले आहे.
पहिला दक्षिण दिग्विजय मिळवुन देणाऱ्या सुभेदाराने आपला स्वतंत्र सवतासुभा निर्माण केल्याचे स्पष्ट झाले.
'A party with a difference' असलेला भाजप ने आपले पाय मातीचेच आहेत परत एकवार दाखवुन दिले.

Sunday, November 21, 2010

मा. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मा. मुख्यमंत्री साहेबांनी केवळ मराठी मधुनच पत्रकार परिषद घेण्याचे जाहिर केले आहे. मा. मुख्यमंत्र्यांचे या निर्णयासाठी अभिनंदन.
यापुढे कारभार मराठीभिमुख होईल अशी काही समजुत करुन घेण्यात अर्थ नाही. त्यासाठी सत्तेच्या आणि अर्थकारणाच्या चाव्या ज्या वर्गाच्या हातात आहे त्यात मराठी भाषा बोलणारा टक्का वाढायला हवा.
ता.क. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवुन हा निर्णय घेण्यात आला नसेल अशी अपेक्षा आहे.

Thursday, November 18, 2010

दगा...

हे एका कवितेचे विडंबन आहे, ३-४ वर्षापुर्वी केलेले. आज अचानक हे विडंबन हाती लागले. मुळ कविता आठवत नाही.

आठवतं तुला त्या भेटीत,
खेटरांनी तिने तुला सडकले होते,
भर दुपारि तुला जणु,
चांदणेच तिने दाखविले होते.

आठवतं तुला त्या भेटीत,
भाऊ तिचा भडकला होता,
ऒल्या ऋतुत, ओल्या वेताने,
तुझा देह रक्ताळला होता.

आठवतं तुला त्या भेटीत,
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझ्या जखमा बांधता बांधता,
मी पुरता वैतागलो होतो.

आठवतं तुला त्या भेटीत,
भावनांनी कविता रचली होती,
आणि न वाचताच तिने,
कविता dustbin मधे फ़ेकलि होती.

आठवतं का तुला नंतर
गम्मत काय झाली होती,
मला मात्र स्मरत नाही,
कारण ती माझ्या बाहुपाशात होती.

Friday, November 05, 2010

हॅलोवीन

दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी हा ’हॅलोवीन’ सण युरोप, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये हा सण साजरा करतात. या सणाला आपले पूर्वज परत येतात असे मानल्या जाते. त्या प्रित्यर्थ भोपळ्याचे वेगवेगळे आकार बनवतात. आम्ही पण भोपळ्य़ापासुन स्माइली बनवला.









Saturday, October 16, 2010

राष्ट्रकुल

प्रिय गण्या,

दिल्लीला जावुन आलो तेव्हापासुन तब्येत जरा नाजुक झाली आहे. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा पहायला गेलो होतो. १९८२ नंतर प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम भारतात आयोजीत केल्या गेला. म्हटले बघावे कसा होतो ते. पावसाने धिंगाणा घातला होता, ऐन स्पर्धा तोंडावर आली आणि हा पाऊस. निसर्गाचे हे तंत्र तर आपले क्रिडामंत्री गिलसाहेब एकदा जाहिरपणे बोलले कि राष्ट्रकुल साठी खर्च जास्त होतोय. तुला सांगतो गण्या, हे म्हणजे कार्य भरात आले असताना मुलीच्या मामाने रुसुन बसावे तसे झाले. त्यानंतर केंद्रिय दक्षता आयोगाने गिल साहेबांची री ओढत खर्चावर कडक ताशेरे ओढले आणि मग कलमाडी आणि मंडळींच्या नावाने सगळ्यांनी बोंब ठोकली. माध्यम आणि विरोधक कामाला लागली. राष्ट्रकुलच्या भ्रष्टाचाराचे किस्से आम आदमीला कळु लागले.
बालपणी ऐकलेल्या अरेबियन नाईट च्या १००१ सुरस आणि चमत्कारिक कथा म्हणजे यापुढे किस झाड कि पत्ती. अबे, १६०० रुपयचा पेपर ’पुसण्यासाठी’, असे बरेच चमत्कार समोर आलेत. (तो न वापरलेला पेपर एकदा पहावा, असे फ़ार मनी होते, पण तो फ़क्त खेळाडुंसाठीच आहे असे कळले) आजवर झाल्या नसतील अश्या स्पर्धा भरवुन दाखवु हि दर्पोक्ती कलमाडी खरी करणार अशीच परिस्थीती निर्माण झाली होती. स्टेडियम जवळचा पुल कोसळला, कोठे नागराजाने दर्शन दिले, कोण्य़ा खेळाडुचा पलंग तुटला. शेवटी काही पर्याय शिल्लक राहिले नाही हे पाहुन पंतप्रधानांनी परिस्थीती ताब्यात घेतली. आपल्या संयोजन समितीच्या कारनाम्यांमुळे खालच्या मानेने जगापुढे जाण्याची नामुष्की आली. हे सगळे कमी म्हणुन की काय दिल्लीत पर्यटकांवर झालेला गोळीबार.
पण एकदाच्या स्पर्धा सुरु झाल्या आणि भारताचे संयोजन तावुन सुलाखुन निघाले. सगळ्या परिक्षामधे खरे उतरले. आपल्या यजमानपदाची बूज राखल्या गेली.

उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाने पारणे फ़ेडले. यशस्वी संयोजनासाठी भारताच्या वाट्याला कौतुक आले. आपल्या खेळाडुंनी पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळवला म्हणजे सोने पे सुहागा. १०१ पदक. त्यात ३८ सुवर्ण. स्वप्नवत वाटते रे!! अजीबातच अपेक्षा नव्हती. क्रिकेट शिवाय आपण काही खेळतो हे वेळेस पहिल्यांदा कळले. लोक हॉकी आणि बॉक्सिंग चे सामने पहायला गर्दी करत होते. नेमबाज, धनुर्धर, बॉक्सर पदकांची लयलुट करुन आले. त्या सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
गेल्याच आठवड्यात परत आलोय. एकदा तो १६०० रुपड्याचा ’पुसण्य़ाचा’ पेपर पहावा म्हणुन खेळाडुंच्या होस्टेल मध्ये जाण्य़ाचा प्रयत्न केला. पण आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत, मध्येच त्यांच्या तावडीत सापडलो. असो अंग ठणकते आहे.

लेखन सीमा.
-अम्या.

ता.क.- दिल्लीस गेला कधी तर सुरक्षा व्यवस्थे पासुन जपुन.

Wednesday, October 13, 2010

आता कायम सदस्यत्व हवे.

तब्बल एकोणीस वर्षांच्या कालखंडानंतर भारत सुरक्षा समितीचे सदस्यपद भूषवीत आहे. आमसभेत 190 पैकी 187 सदस्यांनी भारताला पाठिंबा दिला. अस्थायी सदस्यपदासाठी झालेले हे उच्चांकी मतदान आहे. ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. जागतिक पातळीवर गेल्या काही वर्षांत भारताने बजावलेल्या भूमिकेवर जागतिक समुदायाने उमटवलेली ही मान्यतेची मोहोर आहे.

तो भारताचा अधिकार आहे. सध्या अमेरिका, इंग्लंड, फ़्रान्स, रशिया आणि चीन हे सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत.भारत लोकसंख्येत चीन खालोखाल आहे. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारताची आर्थिक स्थिती इंग्लंड, फ़्रान्स आणि रशिया पेक्षा उत्तम आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दादा आहे.
भारताने स्वबळावर चांद्रमोहिम हाती घेउन ती पार पाडली आहे. DRDO, इस्त्रो यांचे नाव जगात आदराने घेतले जाते. आर्थिक उदारिकरणानंतर भारतीय उद्योग जागतिक स्तरावर पोचले.

भारत हे एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी संबंध तोडल्यावर सुद्धा भारताने कोणासहि अणुतंत्रज्ञान दिले नाही.


भारताचे सैन्य हे नागरी शक्तीच्या ताब्यात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेमध्ये ५०००० पेक्षा अधिक भारतीय सैनिक आहेत. भारताचे धोरण आक्रमक नाही. अमेरिकेने उजाड केलेल्या अफ़गाणिस्तानमध्ये भारत महत्वपुर्ण विकासकामे करत आहे.
मालदीवला लष्करी मदत करुन तेथील बंडाळी भारतीय सैन्याने मोडुन काढली. बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवुन देताना पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. आशिया खंडात आणि एकुणच जागतिक स्तरावर भारत महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे.

Monday, April 28, 2008

गाण्यातले झाड

...आणि मग कुमार गंधर्व बागेश्री रागात गाउ लागतात ’टेसुल बन फ़ुले’ - हरेकृष्णजी. माझ्या मागच्या लिखाणावर हरेकृष्णजी यांची ही प्रतिक्रिया. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, हरेकृष्णजी.
प्रतिक्रिया वाचुन मी विचार केला कि बघुयात तर पलाश शिवाय इतर कोणते वृक्ष गाण्यामध्ये आले आहेत?
मिळालेली उत्तरे भन्नाट आहेत, पुर्ण नाहीत; पण intersting आहेत. बालपणातले कौतुक सगळ्य़ात जास्त आहे ते निंबोणीला ’निंबोणीच्या झाडामागे...’ हे तर घराघरातल्या मायमाऊलीचं आवडतं अंगाई गीत.
या अंगाईगीताचा वापर करुन बऱ्याचदा बाबा लोक पण आपला गळा साफ़ करुन घेतात;निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला चांदण्याला नीज आली,तरीही नंदलाला झोपत नाही
(बाबांनी गायल्यावर झोप येण्यापेक्षा उडण्याचीच शक्यता अधिक) हे पाहुन रातराणीच्या गंधाचा आसरा घ्यावा लागतो,
सावल्यांची तीट गाली, चांदण्याला नीज आली रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे, नीज माझ्या नंदलाला रे॥
कोणी बच्चे कंपनीला बोलावते, ’या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फ़ुले वेचुया’ आणि कंपनी मोराला आंब्याच्या वनात नाचायला सांगते.
तर कोणी माहेरवाशिण आपले बालपण आठवताना सांगते, बकुळी माझी सखी जिवाची जन्मांतरीचे प्रेम जुने,
मला पाहता फ़ुलते ती अन तिला पाहता मी ही फ़ुलते.
शब्द हे अक्षर असतात. अक्षर म्हणजे कधीही न भंगणारे. इच्छेविरुद्ध निरोप घ्यायचा प्रसंग आला तर कोणितरी आठवण म्हणुन शब्दच जपुन ठेवायला सांगतय,
’शब्द शब्द जपुन ठेव, बकुळीच्या फ़ुलापरी’ एखाद्याला देण्यासाठी यापेक्षा अमिट भेट ती काय असणार?
प्रियकर प्रेयसीला ऐकवतो, ’दुरच्या रानातल्या बकुळीच्या तळी, प्रितीची गीते किती प्रिये रंगली पहा.’
बकुळ जसे सतत आनंदात आहे तसे चाफ़्याचे मात्र नाही, तो खंत करतोय कसली तरी:
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी; काही केल्या फुलेना. लतादिदिंनी गायलेल्या या गीतात कवि ’बी’ चाफ़्याला फ़ुलविण्यासाठी केतकीच्या बनी घेउन गेले, आंब्याच्या वनात नेउन मैनेसवे गाणी म्हटली, तेव्हा कोठे चाफ़ा फ़ुलला.चाफ़्याच्या संदर्भातलं आणखी एक गीत मला मिळाल ते गदिमांच मालती पांडेंच्या आवाजातल,
लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छ्पेल का?
प्रीत लपवुनी लपेल का ?
मोगरा पण दोन गीतांमध्ये दरवळतो. ज्ञानेश्वरांचा ’मोगरा फ़ुलला’ तर गदिमांना पडलेला प्रश्न ’का मोगरा फ़ुलेना?’.
एका नवयौवनेला सावध राहण्याचा सल्ला देत कवी म्हणतो ’केतकीच्या बनात उतरत्या उन्हात सळ्‌सळ्‌ पानात जपून जा जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग’ आणि त्याच वेळेस जगाची रीतभात जाणुन असलेली कोणाला सुनावीत असते ’चिंचा आल्यात पाडाला हात नको लावूस झाडाला माझ्या झाडाला !माझ्या नजरेत गोफणखडा पुढं पुढं येसी मुर्दाडा काय म्हणू तुझ्या येडाला ?’नाहीतर ’मी लवंगी मिरची कोल्हापुरची’ असे ठसक्यात सांगत असते. शहरी भागात दारोदार दिसणारा गुलमोहर वसंतात फ़ुलतो. आणि त्याच्या फ़ुलण्य़ाने कुणी अभिसारीका आपल्या प्रियकराच्या आठवणीने गाउ लागते ’अंगणी गुलमोहर फुलला....वसंत आला, याल तुम्हीही, कोकिळ कुजबुजला’ प्रीतीची किमयाच न्यारी, तेथे ’दगडांच्या देशा’ असलेला महाराष्ट्र, नंदनवन काश्मिर वाटु लागतो आणि चिंचेचे झाड चिनार दिसु लागते. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !
Jealousy thy name is woman सिद्ध करणारी महाभारतातली पारिजात आणि सत्यभामेची कथा तशी सर्वज्ञात तीच कथा गदिमा कवितेत रचतात बहरला पारिजात दारी फुले का, पडती शेजारी कवि अनिल,’किती जरी घातले पाणी, सावली केली केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली’ असे सांगत आपण नेमके कोठे जात आहे यावर भाष्य करतात.

जाता जाता:
माळ्याच्या मळ्यामंदी... अशी सुरुवात असलेले दोन गाणे आहेत
दादा आणि उषा चव्हाण यांचे माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी... आणि साधी माणसं मधील माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पानी जातं.
दादांच्या गाण्याची सुरुवात जरी माळ्य़ाच्या मळ्यामंदी अशी असली तरी नंतर गाण्यात झाडाचा काही उल्लेख नाही.
आणि साधी माणसं मधील माळ्याच्या मळ्यामंदी या गाण्यात माहेरची ओढ फ़ार छान लक्षात येते.
पण अस्सल मळेवाल्याचे वाटावे असे गीत आहे अवधूत गुप्तेचे काळी माती ....हिरवे शिवार. या गाण्यात सगळ्य़ात छान पद्धतीने भाज्यांचा उल्लेख असावा.
मिरचीचा तोरा, काकडीचा बांधा, लिंबावानी कांती, मुळावानी रंग गोरा गोरा, टमाटयावानी गाल, भेंडी वानी बोटं हे ऐकल्यावर मंडईत सुद्धा कसले सुख आहे हे कळतं.

Sunday, March 23, 2008

पळस

शिशिराची थंडी ओसरायला लागली. पानगळीने उघडी झालेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली. आणि कोकीळ गाउ लागला "तो आलाय, तो आलाय." yes तो कुसुमाकर, ‌ऋतुराज वसंत आलाय, आता यापुढील २ महिने फ़क्त रंगांची उधळण, रंगाचा उत्सव, वसंतोत्सव.
शिशिरात बोडक्या झालेल्या रानाला केशरी रंगात न्हाउ घालतो तो पळस,सायब तर त्याच्या गर्द केशरी रंगाला ’Flame of the fire' म्हणत आदर देतो.
वसंत आगमनाची वर्दी देतो तो गर्द केशरी पळस. तोच तो तीनच पाने असलेला Leguminosae/Faboideae/Papilionaceae परिवाराचा सद्स्य.
Leguminosae प्रजातीमध्ये सर्वाधिक सदस्य आहेत Faboideae या उपप्रजातीचे.यालाच Papilionaceae असेही नाव आहे. Leguminosae परिवार हा त्याच्या तैलिय फळांसाठी प्रसिद्ध आहे. मटार आणि शेंगा याच प्रजाती मधे मोड्तात. Faboideae म्हणजेच Papilionaceae प्रजातीला नाव दिलेय ते त्याच्या फुलांच्या आकारामुळे. papilionate म्हणजे फ़ुलपाखराच्या आकाराचा.
अरे तर आपला मुळ मुद्दा पळस: पळसाला अनेक पर्यायी नावे आहेत. गुजराती मध्ये खाकडा, तर तमिळ्मध्ये पोरासुम; प्रत्येक फांदीवर लगडलेला लाल फुलांचा घोस पाहुन जंगलाला आग लागली असावी असेच वाटते म्हणुन सायब याला Flame of the forest म्हणतो, याची फ़ुले पोपटासारखी दिसतात म्हणुन याला english मध्ये Parrot Tree असेही म्हणतात. त्याला हिंदी भाषेत ढाक किंवा तेसु असे म्हणतात.
संस्कृत मधे पळसाला पलाश म्हणतात, पलाश या शब्दाचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा आहे. बंगाली भाषेत हा शब्द जसाच्या तसा आला आहे.
२०-४० फ़ूट उंच होणाऱ्या या झाडाचे मुळ भारतातलेच.
या झाडाची एक दुर्मिळ पिवळ्या रंगाची जात फ़क्त भारतात आढळते.
हा पळस देवाधर्माच्या कामातही आपला आब राखुन आहे. सरस्वती आणि काली या दोन्ही देवींच्या पुजेत याच फ़ूलाला मान आहे.
तर लग्न कार्यात लागणाऱ्या पत्रावळी आणि द्रोण याच्याच पानांपासुन बनविले जातात. (आताशा plastic चे असतात, पण अजुनही ग्रामीण भागात पळसाचेच पत्रावळी आणि द्रोण वापरतात)पळसाला एप्रिल-मे महिन्यात पाने येतात. मौंजीमध्ये बटुच्या हातात पळसाचीच शाखा दिली जाते.
आयुर्वेदात पळसाचा वापर आतड्यांच्या विकारांवर होतो.


संदर्भ : १. http://www.toptropicals.com/html/toptropicals/articles/trees/butea.htm
२. http://www.ecocam.com/species/Faboideae.html
३. http://www.revolutionhealth.com/drugs-treatments/ayurveda?ns_page=3
४.http://www.rockyroephotographics.com/gallery/logo.php?picturename=albums/userpics/thumb_flame_of_the_forrest2.jpg
५. http://www.plantcreations.com/images/Flame%20of%20the%20Forest%203226c.JPG

Sunday, March 02, 2008

एका पुलाच्या निमीत्त्याने......

द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय....



THIS BRIDGE
WAS DESIGNED AND CONSTRUCTED BY
SOLDIERS OF THE BRITISH ARMY
FEB - MAY 1943
Lt. COL. L. NICHOLSON D.S.O. COMMANDING

७ ऑस्कर विजेता १९५७ साली प्रदर्शित झालेला हा सत्य घटनेवरचा एक छान चित्रपट. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १९४२-४३ मधली घटना. थोडक्यात कथानक...

जपान्यांना बँकाँक - रंगून रेल रोड (पक्षी: लोहमार्ग) बांधताना एका टप्प्यावर क्वाय नदीवर पूल बांधायचा आहे. पूलाची जबाबदारी ज्या जपानी छावणी कडे आहे तिचा प्रमुख आहे कर्नल सायटो (सेसुई हायाकावा). त्याच्या छावणी मधे जे नविन ब्रिटीश युद्धकैदी आणले जातात त्यांना तो पूल बांधायला सांगतो. या युद्धकैद्यांचा प्रमुख आहे कर्नल निकोलस (एलेक गिनीस). कर्नल सायटो ब्रिटीश युद्धकैद्यांना कामाला जुंपतो. कर्नल सायटो ब्रिटीश अधिकाऱ्यांना सुद्धा कष्टाची कामे करण्याची आज्ञा देतो आणि त्याला कर्नल निकोलस विरोध करतो कारण जिनीव्हा करारानुसार अधिकाऱ्यांना कष्टाची कामे सांगता येत नाहित. चिडलेला सायटो निकोलस आणि त्याच्या अधिकाऱ्यांना इतर युद्धकैदी पासुन वेग्ल्य अश्या छळ कोठडीत डांबतो. निकोलसला तो एका जेमतेम एक माणुस मावेल इतक्या छोट्या टपरी मधे कोंडुन ठेवतो. निकोलस तरीही बधत नाही. एकीकडे निकोलस बधत नाही, ब्रिटिश युद्धकैदी जपानी अधिकाऱ्यांना धूप घालत नाही, दुसरीकडे कामाची डेड्लाईन जवळ आलेली. शेवटी सायटो माघार घेतो आणि निकोलस त्याच्या अधिकाऱ्यांनासह पुलाचे काम ताब्यात घेतो.
या छावणीतून अमेरिकन युद्धकैदी शिअर्स (विल्यम होल्डेन) पळुन जातो आणि ब्रिटिश सैन्य़ाच्या ताब्यात सापडतो. ब्रिटिश शिअर्सच्या मदतीने पूल उडवायची योजना आखतात.
त्यासाठी ब्रिटिश मेजर वार्डनच्या नेत्रुत्वाखाली अमेरिकन खलाशी शिअर्स आणि काही ब्रिटिश छापामार पुल उडवायला निघतात. इकडे पुलाचे काम जोरात सुरु असते. निकोलस आपल्या सैन्यात परत एकदा शिस्त आणतो आणि पुलाचे काम पुर्ण करतो. पुलावरुन जेव्हा पहिली गाडी जाईल तेव्हा पुल उडवायचा वार्डनचा कट असतो. त्यासाठी ते पुलाखाली सुरुंग पेरतात.
गाडी जायच्या थोडा वेळ आधी निकोलसला सुरुंगाची तार दिसते आणि तो तिचा माग घेत सायटोसह जातो. सुरुंग ब्रिटिशांनी पेरला आहे हे कळल्यावर निकोलस गोंधळतो, राष्ट्रनिष्ठा कि आपल्याच सैनिकांनी रात्रीचा दिवस करुन तयार केलेला पुल यातील कशाला महत्व द्यावे हे त्याला कळत नाही, पुलावरुन गाडी जात असते नेमका त्याच क्षणी ब्रिटिश अधिकारी वार्डनने फ़ेकलेल्या बॉंब ने जखमी होवून निकोलस सुरुंगाच्या खटक्यावर पडतो आणि पुल ध्वस्त होतो.
शत्रुच्या हाती सापडतील या भीतीने साथीदारांना मारावे लागले म्हणुन वैतागलेला मेजर वार्डन मॉर्टर लॉंचर फ़ेकुन देतो आणि युद्धाची निरर्थकता दाखवत चित्रपट संपतो.
चित्रपटाची पटकथा बेतली आहे, पीअरे बाउलो लिखीत(Pierre Boulle)द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय नामक फ़्रेंच कादंबरीवर.
१९४२-४३ मध्ये घडलेल्या घटनेचा नायक होता ब्रिटिश लेफ़्टनंट कर्नल फिलीप तुसे (Philip Toosey). प्रत्यक्षात पुल बनवायला ८ महिने लागले होते. पुल सुद्धा २ बनवले होते आणि ते पुल २ वर्ष वापरण्यात आले.

चित्रीकरण श्रीलंकेच्या घनदाट जंगलातले आहे.
संवाद उत्कृष्ट आहेत. उदा. छावणी बद्दल शिअर्स निकोलसला म्हणतो, ’Here is no civilisation.' 'Then we have a chance to introduce it.' निकोलस उत्तरतो.
सिनेमातले दोन हेकेखोर अधिकारी (निकोलस आणि सायटो) दोन वेगवेगळ्या संस्कृती मधला संघर्ष दाखवता्त.पराभूत झाले तर हाराकिरि असे मानणाऱ्या संस्कृतीचा सायटो निकोलसला म्हणतो,’I hate the British. You are defeated, but you have no shame. You are stubborn, but have no pride. You endure, but you have no courage.'
प्रत्यक्षात त्या दोहोत कितीतरी साम्य आहे. तोच अहंकार, कामावरची निष्ठा (छावणीतुन पळुन जाण्याबाबत निकोलस म्हणतो,’वरिष्ठांनी आज्ञा दिल्यामुळे मी शरणागती पत्करली आहे, त्यामुळे पळुन जाणे हा आज्ञाभंग होईल.)
निकोलस पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत जागरुक आहे, त्याबाबतीत तडजोड करायला तो तयार नाही. दुसरा एक युद्धकैदी डॉक्टर क्लिप्टन (जेम्स डोनाल्ड) निकोलस ला जेव्हा विचारतो कि ’शत्रुसाठी इतका दर्जेदार पुल तयार करणे म्हणजे, स्वराष्ट्राशी बेइमानी नव्हे काय?’ निकोलस त्याला सांगतो कि या पुलामुळे त्याची बटालियन परत एकदा सैनिक असल्यागत वागु लागली आहे,ते जे काही करत आहेत त्याचा त्यांना अभिमान वाटतो,’One day the war will be over. And I hope that the people that use this bridge in years to come will remember how it was built and who built it. Not a gang of slaves, but soldiers, British soldiers, Clipton, even in captivity’
युद्ध काळातही त्याचा आशावाद कायम आहे.
चित्रपटाला ८ ऑस्कर नामांकने मिळाली होती. त्यातील फ़क्त सहकलाकाराचे सेसुइ हायाकावा (कर्नल सायटो) सोडुन इतर सर्व ऑस्कर मिळालीत.
१. सर्वोत्कृष्ट चित्रपट
२. सर्वोत्कृष्ट कलाकार - एलेक गिनीस
३.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - डेव्हीड लीन
४. इतर भाषेतील कथानकावर आधारित सर्वोत्कृष्ट पटकथा - (मुळ कथानक फ़्रेंच)पीअरे बाउलो
५. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफ़ि
६. सर्वात हिट सिनेमा
७. सर्वोत्कृष्ट संकलन.


जाता जाता:
द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय मध्ये युद्धाची निरर्थकता दाखवताना हिंसाचार कमीत कमी दाखवला आहे, इथे जे.पी. दत्ताच्या बॉर्डर ची (सनी देओल) आठवण येते, ३ तास आपला मनसोक्त हिंसाचार दाखवुन जे.पी. गाणे ऐकवतात ,’मेरे दुश्मन मेरे भाई....यह जंग ना होने पाए.’ जे.पी. ना काय सांगायचे हे मला आजतागायत कळले नाही. त्यांना तरी कळले असेल?

Sunday, November 04, 2007

कॉल सेंटरचा बळी

ज्योतीवर जो प्रसंग ओढ्वलेला प्रसंग दुर्दैवी आहे. ज्योतीच्या मारेकऱ्यांना फ़ाशी द्या, किंवा जीवंत जाळा..कंपनीवर FIR दाखल करा. ह्या सगळ्या मलमपट्ट्या आहेत, याने प्रश्न सुटणार नाहीय.
प्रश्न हा आहे की इतर कोणीतरी ज्योती होऊ नये त्यासाठी काय करायचे?
गुन्हेगारांना फ़ाशी द्यायची? हा न्याय आहे की सूड? (मी मानवाधिकार वाला नाही, माझे मत आहे की त्यांना फ़ाशी व्हायला हवी.) पण फ़ाशी ने इतर गुन्हेगारांना जरब बसते? २००४ मधे धनंजय चॅटर्जी ला असल्याच गुन्ह्यासाठी फ़ाशी दिली, तरिही ही घटना घडलीच. गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी, कारण त्यांनी समाजाने मान्य केलेले नियम मोडलेले आहेत. पण परत तेच, हा कायम स्वरूपी इलाज नाही.
ज्योती कॉल सेंटरचा बळी नाही, घटना घडताना ज्योती कॅब ऎवजी एखाद्या दुसऱ्या गाडीत असती तर? स्त्री कडे पाहण्याचा जो attitude आहे, ज्योती त्याचा बळी आहे.
मला वाटते याला उपाय आहे, तो म्हणजे प्रशिक्षण ’पुरुषांचे प्रशिक्षण’.
पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा attitude जोवर एक ’भोग्य’ असा आहे तोवर या घटना घडणारच. या प्रशिक्षणाची गरज समाजातल्या सर्व स्तरातल्या (आर्थिक आणि सामाजिक) पुरुषांना आहे. ही दिर्घकाळ चालणारी procedure आहे, पण ती सुरु व्हायलाच हवी.
कॉल सेंटर मधे काम करणाऱ्या स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच पुढे येतो. ही जबाबदारी सर्वांची आहे. कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षेचे नियम कठोरतेने पाळल्या जात आहेत की नाही हे पहायला हवे. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्याचे background verification होते त्याप्रमाणे वाहनचालक, सुरक्षा कर्मचारी यांचे पण background verification करावे. संबंधीत कर्मचाऱ्याने पण सुरक्षेचे नियम पाळावेत.उदा. वाहनचालकाला ठरलेल्या मार्गाऐवजी दुसरी कडे गाडी नेण्याची परवानगी देउ नये किंवा स्वत: कर्मचाऱ्याने मार्ग बदलण्याची सुचना देउ नये.

Saturday, October 13, 2007

दक्षिणेतला मराठी सराफ

आजचा सकाळ वाचला आणि डोळे धन्य धन्य जाहले.अरे काय हे, तुम्हीच ही बातमी वाचा.
..........
तिरुअनंतपुरम (केरळ), ता. १० - त्रिसूरमधील एका मराठी सराफाला ८५ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
.......


मराठी माणुस पश्चिमेला पार साता समुद्रापार पोचला. पुर्वेकडेहि मराठी ऐकु येउ शकते. मराठी माणुस उत्तरेकडे (उत्तरेकडे म्हणजे उत्तर दिशेला, उत्तराकडे फ़क्त अर्जुन गेला होता, तेहि ब्रुहन्नडा म्हणुन)गेल्याचे माहित आहे, शिवाजीने औरंगजेबाला ठेंगा दाखवला, राघोबाने अटक (सांप्रत पाकिस्तान) मारली.मध्य भारतात इंदोर, जबलपुर, ग्वाल्हेर, कानपुर येथे नागपुरपेक्षा जास्त मराठी ऐकु येते. आता तर काय राष्ट्रपती भवनातही मराठी ऐकायला येणार.पण दक्षिणेत कोणी मराठी गेल्याचे ऐकु आले नाहि, नाही म्हणायला शहाजी राजे तंजावरला होते, पण त्यानंतर सगळा अंधार, येथले राजकारणी पाहिले कि वाटते रामसेतु बांधायला कोणी गेले नव्हते ह्याचा पुरावा काय? शिवाय 'बचेंगे तो और भी लढेंगे' म्हणणार्‍या दत्ताजी शिंदेचे वारस आपण त्यामुळे रामाच्या सेनेत शिलेदार म्हणुनही मराठी असु शकतात, शिवाय नोकरी अतीप्रिय ना आपल्याला मग ती शिपायाची का असेना?
'नायक' या अनिल कपूरच्या चित्रपटात मराठी पोरीचा बाप अनिल कपूरला नकार देताना म्हणतो ,"१ रुपया तनखा वाली चलेगी पर सरकारी नोकरी चाहिये."हे वाक्य पुरेसे बोलके आहे.
यापलिकडे दक्षिण दिशा सतत रिक्तच. उलट उत्तरेतले आणि दक्षिणेतले आम्हालाच गंडवतात शिवाय आम्हालाच मुंबईत 'मुंबई तुमची...' अणि नागपुरात 'लोटा लेके आये थे..' असे ऐकावे लागते.
सातासमुद्रापार गुरुराज देशपांडे वगैरे प्रभ्रुतींनी झेन्डे रोवलेत, पण खाली दक्षिणेत व्यापार करणारा आणि ८५ लाखाने गंडवल्या जाऊ शकणार्‍या मराठी माणसाचे, हार्दिक अभिनंदन
दक्षिणेत गेला म्हणुन नोकरी न करता व्यापार केला म्हणुन, फ़क्त ती गंडवुन घ्यायची परंपरा त्यांनी तशीच ठेवली, ती परंपरा बदलेल तो सुदिन.

Monday, October 08, 2007

’गोपाळकाला’ च का?

"तू लिहित का नाहिस?", एक दिवस ठेल्यावर पानाची पिचकारी मारुन गण्या बोलला. तो कदाचित माझ्या वटवटिला कन्टाळला होता.
"काय लिहिणार?" "काहिही"
म्हणुन ब्लॉग लिहायचे ठरवले.
ब्लॉग ला नाव काय देणार?
सवाल लाखाचा समोर आला.
विषयाचे बन्धन जर लिखाणाला नाहि तर ब्लॉगचे नाव पण तसेच बन्धमुक्त हवे.
’गोपाळकाला’ या पेक्षा जास्त योग्य नाव काय आहे?
गोपाळकाल्यामध्ये जसे सगळे पदार्थ असतात, तसेच या नोन्द्स्थळावर (पक्षी:ब्लॉग) सूर्याखालील कोणताही विषय असु शकेल....
भाकरी ते बॅले... कोठलाही विषय.

-आपला
कलंदर