Wednesday, December 01, 2010

नवस

"काय तर ही बया, कानामागुन आली आणि तिखट झाली. जॊ येतो तो हिचीच चौकशी करतो." लाल हिरवीला म्हणाली.
"असेच असते इथे, नवी कोणी आली कि तिचाच गाजावाजा असतो, सगळे तिलाच विचारतात. जुनी झाली कि येइल आपल्यात." हिरवीने समजुतदारपणा दाखवला. "पण ती एकटीच थोडी ना आली असेल. कोणी असेल ना सोबत." उजवीने मधेच नाक खुपसले. "कोणी तरी येणार होती कोकणातुन पण येथवर पोहचली नाही वाटते अजुन. त्यामुळे हिच सगळ्य़ात नवी. शिवाय ’आदर्श’ घरातली, म्हणुन मागणी जास्त. पार दिल्ली पासुन लोक आलेत येथवर हिच्यामुळे." हिरवीने माहिती पुरवली.
"मी तर काल ऐकले कि, ज्यांचे नाव हिच्यासोबत आले ते तर घरी गेलेच, पण ज्यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही अश्या लोकांना पण ही भोवली." उजवी सांगु लागली; तिला तोडुन हिरवी परत मधेच म्हणाली,"तु तरी कोठे कमी होती, तुझ्यामुळे पण १-२ जण घरी गेले होते. इथे येताना सगळे असेच असतात. मी पण येथे येताना फ़ार गोंधळ घातला होता; मोठी उलथापालथ केली होती पण शेवटी नशिबात तुमचीच सोबत होती." लाल परत म्हणाली,"एवढी डिमांड असताना ही का नाराज?"

त्या तिघी जणी बोलत असताना, ती मात्र आपल्याच विचारात होती,"काय चुकले माझे? भल्या भल्या धेंडांना धक्का दिला, हे? का म्हणुन माझ्यासोबत त्याने इतक्या निष्ठुरपणे वागावे? का माझे असे तुकडे करावे त्याने? मी त्याचे काहिहि नुकसान केले नव्हते. माझे लचके तोडताना त्याला काहिच कसे वाटले नाही? छे! आता तर माझी किंमत पण कमी झाली, ती लाल तर आधीच जळते माझ्यावर, हे सगळे जर तिला कळले तर हसेल ना ती फ़िदिफ़िदि. असे नाही जमणार काहिहि करुन ती चार पानं मिळवावे लागतील."

इतक्यात कोणाची तरी चाहुल लागली म्हणुन सगळ्या सावरुन बसल्या. पाहिले तर पाटिल साहेब आणि महादु आले होते.
"महाद्या, अरे आदर्श चे ४ पानं गहाळ झालेत. क्राईम ब्रँच वाले येणार आहेत, एन्क्वायरी करायला. चल आटप लवकर. सगळे जरा आवरुन घे. ह्या एन्रॉन, अण्णा आणि दादा च्या फ़ाईली समोर कशाला, जरा कोपऱ्यात सरकव त्या. ती आदर्श ची फ़ाईल समोर काढुन ठेव. त्यांना द्यायची आहे."

पानं गहाळ झाल्याचे ऐकुन त्या तिघींनी निश्वास सोडला, हिरवी म्हणाली,"एक आणखी सोबत, चला तिला लाल च्या बाजुला जागा देऊ."

क्राईम ब्रँच एन्क्वायरी करणार हे ऐकुन तिची कळी पटकन खुलली, "चला, म्हणजे पानं मिळु शकतात तर. म्हसोबा, माझे पानं मला मिळवुन दे रे बाबा. असे झाले तर २ कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा वाहिन तुला."

No comments: