Saturday, October 16, 2010

राष्ट्रकुल

प्रिय गण्या,

दिल्लीला जावुन आलो तेव्हापासुन तब्येत जरा नाजुक झाली आहे. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा पहायला गेलो होतो. १९८२ नंतर प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम भारतात आयोजीत केल्या गेला. म्हटले बघावे कसा होतो ते. पावसाने धिंगाणा घातला होता, ऐन स्पर्धा तोंडावर आली आणि हा पाऊस. निसर्गाचे हे तंत्र तर आपले क्रिडामंत्री गिलसाहेब एकदा जाहिरपणे बोलले कि राष्ट्रकुल साठी खर्च जास्त होतोय. तुला सांगतो गण्या, हे म्हणजे कार्य भरात आले असताना मुलीच्या मामाने रुसुन बसावे तसे झाले. त्यानंतर केंद्रिय दक्षता आयोगाने गिल साहेबांची री ओढत खर्चावर कडक ताशेरे ओढले आणि मग कलमाडी आणि मंडळींच्या नावाने सगळ्यांनी बोंब ठोकली. माध्यम आणि विरोधक कामाला लागली. राष्ट्रकुलच्या भ्रष्टाचाराचे किस्से आम आदमीला कळु लागले.
बालपणी ऐकलेल्या अरेबियन नाईट च्या १००१ सुरस आणि चमत्कारिक कथा म्हणजे यापुढे किस झाड कि पत्ती. अबे, १६०० रुपयचा पेपर ’पुसण्यासाठी’, असे बरेच चमत्कार समोर आलेत. (तो न वापरलेला पेपर एकदा पहावा, असे फ़ार मनी होते, पण तो फ़क्त खेळाडुंसाठीच आहे असे कळले) आजवर झाल्या नसतील अश्या स्पर्धा भरवुन दाखवु हि दर्पोक्ती कलमाडी खरी करणार अशीच परिस्थीती निर्माण झाली होती. स्टेडियम जवळचा पुल कोसळला, कोठे नागराजाने दर्शन दिले, कोण्य़ा खेळाडुचा पलंग तुटला. शेवटी काही पर्याय शिल्लक राहिले नाही हे पाहुन पंतप्रधानांनी परिस्थीती ताब्यात घेतली. आपल्या संयोजन समितीच्या कारनाम्यांमुळे खालच्या मानेने जगापुढे जाण्याची नामुष्की आली. हे सगळे कमी म्हणुन की काय दिल्लीत पर्यटकांवर झालेला गोळीबार.
पण एकदाच्या स्पर्धा सुरु झाल्या आणि भारताचे संयोजन तावुन सुलाखुन निघाले. सगळ्या परिक्षामधे खरे उतरले. आपल्या यजमानपदाची बूज राखल्या गेली.

उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाने पारणे फ़ेडले. यशस्वी संयोजनासाठी भारताच्या वाट्याला कौतुक आले. आपल्या खेळाडुंनी पदक तालिकेत दुसरा क्रमांक मिळवला म्हणजे सोने पे सुहागा. १०१ पदक. त्यात ३८ सुवर्ण. स्वप्नवत वाटते रे!! अजीबातच अपेक्षा नव्हती. क्रिकेट शिवाय आपण काही खेळतो हे वेळेस पहिल्यांदा कळले. लोक हॉकी आणि बॉक्सिंग चे सामने पहायला गर्दी करत होते. नेमबाज, धनुर्धर, बॉक्सर पदकांची लयलुट करुन आले. त्या सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
गेल्याच आठवड्यात परत आलोय. एकदा तो १६०० रुपड्याचा ’पुसण्य़ाचा’ पेपर पहावा म्हणुन खेळाडुंच्या होस्टेल मध्ये जाण्य़ाचा प्रयत्न केला. पण आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत, मध्येच त्यांच्या तावडीत सापडलो. असो अंग ठणकते आहे.

लेखन सीमा.
-अम्या.

ता.क.- दिल्लीस गेला कधी तर सुरक्षा व्यवस्थे पासुन जपुन.

Wednesday, October 13, 2010

आता कायम सदस्यत्व हवे.

तब्बल एकोणीस वर्षांच्या कालखंडानंतर भारत सुरक्षा समितीचे सदस्यपद भूषवीत आहे. आमसभेत 190 पैकी 187 सदस्यांनी भारताला पाठिंबा दिला. अस्थायी सदस्यपदासाठी झालेले हे उच्चांकी मतदान आहे. ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. जागतिक पातळीवर गेल्या काही वर्षांत भारताने बजावलेल्या भूमिकेवर जागतिक समुदायाने उमटवलेली ही मान्यतेची मोहोर आहे.

तो भारताचा अधिकार आहे. सध्या अमेरिका, इंग्लंड, फ़्रान्स, रशिया आणि चीन हे सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत.भारत लोकसंख्येत चीन खालोखाल आहे. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारताची आर्थिक स्थिती इंग्लंड, फ़्रान्स आणि रशिया पेक्षा उत्तम आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दादा आहे.
भारताने स्वबळावर चांद्रमोहिम हाती घेउन ती पार पाडली आहे. DRDO, इस्त्रो यांचे नाव जगात आदराने घेतले जाते. आर्थिक उदारिकरणानंतर भारतीय उद्योग जागतिक स्तरावर पोचले.

भारत हे एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी संबंध तोडल्यावर सुद्धा भारताने कोणासहि अणुतंत्रज्ञान दिले नाही.


भारताचे सैन्य हे नागरी शक्तीच्या ताब्यात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेमध्ये ५०००० पेक्षा अधिक भारतीय सैनिक आहेत. भारताचे धोरण आक्रमक नाही. अमेरिकेने उजाड केलेल्या अफ़गाणिस्तानमध्ये भारत महत्वपुर्ण विकासकामे करत आहे.
मालदीवला लष्करी मदत करुन तेथील बंडाळी भारतीय सैन्याने मोडुन काढली. बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवुन देताना पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. आशिया खंडात आणि एकुणच जागतिक स्तरावर भारत महत्वपूर्ण भुमिका बजावत आहे.