Wednesday, November 24, 2010

मुख्यमंत्र्यांचा दिवस

भारताच्या राजकारणात कालचा दिवस मुख्यमंत्र्यांचा ठरला. बिहारातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने विक्रमी बहुमत मिळवत एकछत्री अंमल प्रस्थापित केला.
कॉंग्रेस, राजद-लोजपा यांचा धुव्वा उडवत परत एकदा नितीशकुमारांनी सत्ता मिळवली आहे. भाजप हा नितीशकुमारांचा (जद(सं)) सत्तेतील भागीदार. कॉंग्रेस ची संख्या ९ वरुन ४ झाली. लालुप्रसादांच्या कंदिलाचा प्रकाश मंदावला आहे. त्यांचे संख्याबळ ४३ चे २२ झाले. रामविलास पासवानांचे तर फ़क्त ३ उमेदवार निवडुन आलेत. कॉंग्रेस, राजद-लोजपा यांना अस्मान दाखवुन सत्ताकारणात ’विकास’ हा महत्वाचा मुद्दा आहे हे बिहारी जनतेने जाणवुन दिले आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी यातुन काय तो बोध घ्यावा.

आंध्रात रोसय्या गेले; किरण रेड्डी आले
प्रकृतीचे कारण देत आंध्र प्रदेशात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री रोसय्या यांनी राजीनामा दिला. जगनमोहन यांना मुख्यमंत्री पदाची असलेली घाई, आधी अम्मा असा ज्यांचा उल्लेख केला त्या सोनिया गांधींवर जगनमोहन यांच्या साक्षी वाहिनीने टिका केली. आधीच जगनमोहन यांना फ़ारसे अनुकुल नसलेले मत त्यांच्या विरोधात गेले. रोसय्यांची गच्छंती त्यांच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे झाली. रोसय्याचे उत्तराधिकारी म्हणून विधानसभा अध्यक्ष किरणकुमार रेड्डी यांचे नाव निश्‍चित झाले.

कर्नाटकात येदियुरप्पा राहिले
कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्यापुढे नमायला लावून मुख्यमंत्रीपद शाबूत राखले आहे. येदियुरप्पा हे सरकारी भूखंडाचे नातेवाईकांना केलेल्या वाटपावरून अडचणीत आले होते. त्यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्याचे संकेत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पण येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपद टिकवले आहे.
पहिला दक्षिण दिग्विजय मिळवुन देणाऱ्या सुभेदाराने आपला स्वतंत्र सवतासुभा निर्माण केल्याचे स्पष्ट झाले.
'A party with a difference' असलेला भाजप ने आपले पाय मातीचेच आहेत परत एकवार दाखवुन दिले.

Sunday, November 21, 2010

मा. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मा. मुख्यमंत्री साहेबांनी केवळ मराठी मधुनच पत्रकार परिषद घेण्याचे जाहिर केले आहे. मा. मुख्यमंत्र्यांचे या निर्णयासाठी अभिनंदन.
यापुढे कारभार मराठीभिमुख होईल अशी काही समजुत करुन घेण्यात अर्थ नाही. त्यासाठी सत्तेच्या आणि अर्थकारणाच्या चाव्या ज्या वर्गाच्या हातात आहे त्यात मराठी भाषा बोलणारा टक्का वाढायला हवा.
ता.क. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवुन हा निर्णय घेण्यात आला नसेल अशी अपेक्षा आहे.

Thursday, November 18, 2010

दगा...

हे एका कवितेचे विडंबन आहे, ३-४ वर्षापुर्वी केलेले. आज अचानक हे विडंबन हाती लागले. मुळ कविता आठवत नाही.

आठवतं तुला त्या भेटीत,
खेटरांनी तिने तुला सडकले होते,
भर दुपारि तुला जणु,
चांदणेच तिने दाखविले होते.

आठवतं तुला त्या भेटीत,
भाऊ तिचा भडकला होता,
ऒल्या ऋतुत, ओल्या वेताने,
तुझा देह रक्ताळला होता.

आठवतं तुला त्या भेटीत,
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझ्या जखमा बांधता बांधता,
मी पुरता वैतागलो होतो.

आठवतं तुला त्या भेटीत,
भावनांनी कविता रचली होती,
आणि न वाचताच तिने,
कविता dustbin मधे फ़ेकलि होती.

आठवतं का तुला नंतर
गम्मत काय झाली होती,
मला मात्र स्मरत नाही,
कारण ती माझ्या बाहुपाशात होती.

Friday, November 05, 2010

हॅलोवीन

दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी हा ’हॅलोवीन’ सण युरोप, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये हा सण साजरा करतात. या सणाला आपले पूर्वज परत येतात असे मानल्या जाते. त्या प्रित्यर्थ भोपळ्याचे वेगवेगळे आकार बनवतात. आम्ही पण भोपळ्य़ापासुन स्माइली बनवला.